न्यायालयाच्या खराब भिंती पुसण्याची तंबाखूबाज पोलिसाला शिक्षा

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात तंबाखूचं सेवन करणार्‍या पोलिसाला कोर्टानेच चपराक लगावली. तोंडात तंबाखूचा तोबरा भरून समोर आल्यामुळे संतप्त न्यायाधीशांनी न्यायालयातील खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा पोलीस हेड कॉन्स्टेबलला दिली. बबन गेणबाजी साळवे हे पोलीस हेड कॉन्स्टेबल एका खटल्यात साक्षीसाठी आरोपीला घेऊन आले होते.

न्यायाधीशांसमोर जाताना त्यांनी तोंडात तंबाखूचा तोबरा भरला होता, त्यामुळे त्यांना बोलणंही अशक्य झालं.

‘तोंडात काय आहे?’ असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारल्यावर त्यांनी सुपारी असल्याचं सांगितलं. मात्र न्यायधीशांनी इतर पोलिसांना बोलावून पाहणी करण्यास सांगितलं. त्यावेळी पोलिसांनी साळवे यांच्या तोंडात तंबाखू असल्याचं सांगितलं. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्यांना कोर्टात मावा, तंबाखू आणि गुटखा थुंकल्यामुळे खराब झालेले कोपरे स्वच्छ करण्याची शिक्षा दिली. त्यामुळे साळवे यांनी कोर्टातले अस्वच्छ कोपरे साफ केले

न्यायालयाच्या आवारात धुम्रपान, तंबाखू सेवन करण्यास मनाई आहे. धुम्रपान करुन अस्वच्छता केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, मात्र तरीही सर्रास तंबाखू, मावा आणि गुटखा खाऊन नागरिक थुंकतात. आता न्यायालयानं शिक्षा सुनावल्यामुळे या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पोलीस हेडकॉन्स्टेबल न्यायाधिशांसमोर तंबाखू खाऊन आल्याची तक्रार जिल्हा सत्र न्यायालयाकडून आली आहे. तक्रारीची चौकशी केली जाईल. पोलिसांनी न्यायालय आवारात व अन्य सरकारी कार्यालयांत जाताना धूम्रपान व तंबाखू सेवन न करण्याबाबत बजावण्यात येईल.
-डॉ.अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक

LEAVE A REPLY

*