जमिनीसाठी आईचा गळा घोटला ; पारनेरच्या तरुणास जन्मठेप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – आईच्या नावावर असणार्‍या जमिनीची वाटणी केली नाही म्हणून सैन्यात असणार्‍या पुत्राने आईची गळा दाबून हत्या केली होती. याप्रकरणी दोषी धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आरोपीस जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. युवराज केशव मांडगे (रा. पिंपरी गवळी, रा. पारनेर) असे आरोपीचे नाव आहे.
पारनेर तालुक्यात खेडेगावात राहणार्‍या ताराबाई केशव मांडवे यांनी स्वत:च्या घरच्या संसाराची जबाबदारी अंगावर घेत दोन मुलांना चांगले शिकविले होते. शेतात राबून मुलांना पायावर उभे करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले होते. याचे फलीत म्हणजे ताराबाई यांची दोन्ही मुले देशसेवेसाठी सरकारी खात्यात रुजू झाली होती. केशव मांडवे यांच्या नावावरील आठ एकर शेती ताराबाई यांच्या नावावर वर्ग झाली होती.
त्यामुळे या जमिनीची वाटणी करून द्यावी अशी मागणी सैन्यात भरती झालेल्या युवराजने केली होती. मात्र आईने त्यास काही काळ थांबण्यास विनंती केली. ही सर्व मालमत्ता तुमचीच आहे. त्यामुळे इतकी घाई का? असे म्हणून आईने त्याची समजूत काढली. मात्र तो काही ऐकण्यास तयार नव्हता. दि. 15 ऑगस्ट 2016 रोजी आरोपीचा पोलीस खात्यात कार्यरत असणारा दुसरा भाऊ जितेंद्र मांडगे हा शिरुर पोलीस ठाण्यात झेंडावंदन करण्यासाठी सकाळीच गेला होता. या दरम्यान आरोपी युवराजने त्याच्या आईसोबत वाद घातला. जमीन वाटून दे असे म्हणून त्याने तिचा गळा आवळून ठार केले. भाऊ आल्यानंतर काय सांगायचे असा प्रश्‍न पडल्यानंतर त्याने आईचा मृतदेह घरामागील मक्याच्या शेतात नेवून टाकला.
पोलीस खात्यातील जितेंद्र घरी आल्यानंतर त्याने आईला आवाज दिला. मात्र घरातून कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. त्यावेळी निर्दयी युवराज घराच्या पडवित बसलेला होता. आई कोठे गेली अशी विचारणा केली असता माहित नाही असे उत्तर मिळाले. बराच वेळ आईची वाट पाहिली तरी ती आली नाही. युवराजकडे पाहुन घरात काहीतरी झाल्याचे जितेंद्रच्या लक्षात आले.
त्याच्या अंगावर ओरखड्या तसेच शर्टाला रक्त लागलेले होते. जितेंद्र याने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने आईची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह मक्याच्या शेतात मिळून आला. जितेंद्र याने आईचा मृतदेह पडवित आणले तेव्हा युवराज तेथेच बसलेला होता. ही सर्व घटना पाहुन देखील त्याच्या चेहर्‍यावर कोणतेही दु:ख जाणवले नाही. बराच वेळ तो शांत बसलेला होता. दरम्यान या घटनेची माहीती सुपा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलीस उपनिरीक्षक एस. आर. गोरे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर झाली. या घटनेत एकही सबळ पुरावा, कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र तपासी अधिकारी गोरे, वैद्यकीय अधिकारी उंदरे, फिर्यादी जितेंद्र मांडगे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा नाशिक यांचा अहवाल व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर सरकार पक्षाचे वकील ऍड. विष्णुदास भोर्डे यांच्या प्रबळ युक्तीवाद ग्राह्यधरुन आरोपी युवराज केशव मांडगे यास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, तो न भरल्यास सहा महिना तरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

*