अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : आरोपीस 12 वर्षे सक्तमजुरी

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नांदगाव येथे मल्हारी सखाराम उमाप (वय 25) याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी उमाप याला दोषी धरत जिल्हा सत्र न्यायाधीशांनी त्यास 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंडातील पाच हजार रक्कम पिडीत मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
30 जुलै 2016 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी मल्हारी याने एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून पिडीत मुलीस घरी भांडे घासण्याच्या बहाण्याने बोलविले. त्यावेळी आरोपी घरात एकटा होता. या एकटेपणाचा फायदा पिडीतेवर अत्याचार केला होता. हा प्रकार पिडीत मुलीने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती देवाडकर यांनी केला.
मंगळवारी या खटल्याची अंतीम सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अहवाल, पोलीस अधिकारी स्वाती देवाडकर यांची साक्ष, सबळ पुरावे व सरकार पक्षाचे वकील ऍड. सतिश पाटील यांचा प्रबळ युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी मल्हारी सखाराम उमाप यास 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, तो न भरल्यास एक वर्षे साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडातील पाच हजार रक्कम पिडीत मुलीस द्यावेत असे आदेशात म्हटले आहे.

कर्जत ताजुक्यातील कोपर्डी निर्भया घटनेनंतर 17 दिवसांनी ही घटना घडली होती. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री तसेच अन्य राजकीय नेत्यांनी रात्री 2 च्या सुमारास पिडीत मुलीच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले होते.  घटनेनंतर याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*