Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लाखोंच्या बनावट नोटा छापल्या श्रीगोंदा, पारनेर, बारामती व दौंडचे आरोपी

Share

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- बनावट नोटांच्या प्रकरणात कालअखेर सात आरोपींना शिताफीने पकडून त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे संगणक व आणखी काही बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम 489, (क),(ड),(ई),201,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

6 नोव्हेंबर 2019 रोजी श्रीगोंदे पोलीस स्टेशनचे सपोनि सतीश गावीत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची ह्युंदाई वेरना कार क्रमांक एमएच12 एनई85 मधून बनावट चलनी नोटा घेऊन पारनेर तालुक्यातील सुपा येथून श्रीगोंद्यातील घोगरगाव येथे सोने खरेदी करण्यासाठी जाणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक इशू सिंधु, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतीश गावीत, पोसई अमित माळी, तसेच विकास वैराळ, अमोल कोतकर, अमोल शिंदे, संजय कोतकर यांंनी छाप्याचे नियोजन करून मांडवगण फाटा ता.श्रीगोंदे येथे सापळा लावला.

श्रीगोंदे पोलीस स्टेशन येथे अतुल रघुनाथ अगरकर व माने नावाच्या इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून माने नावाच्या इसमाचे पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन घेतले. तो बारामती येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. श्रीगोंदे पोलीस स्टेशनचे सतीश गावीत व पोलिसांनी श्रीकांत सदाशिव माने रा. बारामती याला ताब्यात घेतले व त्याला श्रीगोंदे पोलीस स्टेशन येथे आणून 7 नोव्हेंबर 2019 रोजीच्या गुन्ह्यात अटक केली. त्याला विचारपूस करता माने याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. परंतु पोलीसांच्या प्रश्नांच्या भडीमारापुढे त्याची हुशारी जास्त काळ टिकू शकली नाही व तो पोपटासारखा बोलता झाला.

श्रीकांत सदाशिव माने याचे पुणे येथील एका महिलेबरोबर व्यवहारातून संबंध आले तो तीच्याकडे गेला तेव्हा ती महिला बनावट छापण्याचे काम करत होती. तेव्हा श्रीकांत माने यालाहीा झटपट श्रीमंत होण्याचे लालच लागले व आपण सुद्धा अशा प्रकारच्या नोटांची छपाई करु शकतो असे त्याला वाटले. परंतु त्यासाठी लागणारे भांडवल त्याच्याकडे नव्हते. त्याला कोणीतरी फायनान्सर हवा होता. तेव्हा श्रीकांत माने याने त्याचा हा प्लॅन त्याचा मित्र युवराज लक्ष्मण कांबळे रा.गुणवडी ता.बारामती याला बोलून दाखविला. युवराज लक्ष्मण कांबळे हा चालकाचे काम करतो त्यातूनच त्याची यापूर्वी श्रीगोंद्यातील पिंपळगाव पिसा येथील शिवाजी रामदास जरे याच्याशी ओळख झालेली होती व तो असाच 2 नंबरचा काहीना काही धंदा करतो हे त्याला माहीत होते व तो त्याला मदत करु शकतो असे कांबळे याला वाटले म्हणून युवराज कांबळे व श्रीकांत माने हे शिवाजी जरे याला भेटण्यासाठी घारगांव ता.श्रीगोंदे येथे आले व त्याला सगळा प्लॅन सांगितला व त्याला पैसे मागितले. त्यानंतर शिवाजी जरे याने पैसे जमवून श्रीकांत माने याला फोन केले.

परंतु त्यावेळी श्रीकांत मानेला वेळ मिळाला नाही म्हणून ते पैसे आणण्यासाठी गेले नाही. परंतु जेव्हा वेळ मिळाला त्यावेळी श्रीकांत माने याने शिवाजी जरे याला संपर्क केला तेव्हा शिवाजी जरे कडील पैसे संपले होते. तेव्हा आरोपी श्रीकांत माने याच्याकडे असलेली बुलेट गाडी शिवाजी जरे व श्रीकांत माने यांनी मळद येथील एका व्यक्तीकडे गहाण ठेवली व त्याचेकडून 3 हजार रुपये घेऊन नगरला गाठले.अहमदनगर येथील एका दुकानातुन त्यांनी नोटा छापण्यासाठी एक संगणक, प्रिंटर, कागद, कटर, काच, कलर स्केचपेन असे साहित्य खरेदी केले. श्रीकांत माने, युवराज कांबळे, शिवाजी जरे व शिवाजी जरे याचा मांडवगण ता.श्रीगोंदे येथील एक मित्र अशा चौघांनी नोटांची छपाई करायची व शिवाजी जरे याचा घोगरगाव येथील गुंड मित्राने त्याची विल्हेलाट लावायची असा यांचा धंदा सुरु झाला.

पहिल्यांदा 14 हजार रुपये छापले ते घोगरगाव येथील गुंड मित्राच्या मध्यस्थीने चिंचोली काळदात येथील एका व्यक्तीला 5हजार रुपयाला विकल्या. शिवाजी जरे याने श्रीकांत माने याच्या गहाण ठेवलेल्या बुलेट गाडीच्या रकमेतील काही पैसे खाल्ले म्हणून त्याने नोटा छपाईचा सर्व सेटअप उचलून बारामती येथे नेला व त्यानंतर तो युवराज कांबळे याची सासुरवाडी खडकी ता.दौंड े येथे नेला व तेथे त्यांनी नोटा छपाईचा धंदा सुरु केला. काही दिवसांपूर्वी अतुल रघुनाथ आगरकर रा.सुपा ता.पारनेर याला कोठुन तरी चोरीचे सोने विकत घ्यायचे होते.

त्यासाठी शिवाजी जरे याचा श्रीगोंद्यातील घोगरगाव ता.श्रीगोंदे येथील मित्राच्या मध्यस्थीने अतुल अगरकर याने श्रीकांत माने याला 10लाख रूपयांची मागणी केली होती त्यामुळे श्रीकांत माने,युवराज कांबळे हे कामाला लागले व त्यांनी अंदाजे 7,50,000 रूपयांची छपाई केली.परंतु त्यांना छपाई करणे उरकत नव्हते म्हणून श्रीकांत माने याने त्या पुण्यातील महीलेकडुन 2,50,000 रु नोटा पुण्यात जावुन आणल्या व 10,00,000 रु जमवुन तो व युवराज कांबळे असे ते पैसे देण्यासाठी कर्जत येथे आला.तेथे शिवाजी जरे याचा घोगरगांव ता.श्रीगोंदे येथील मित्राने अतुल आगरकर यास 10 लाख रुपये न घेता थोडेच पैसे घे असे सांगितले म्हणुन त्याने 3,50,000 रु घेतले. व त्याच वेळी घोगरगांव येथील ईसमास 50,000 रु च्या नोट दिल्या होत्या . यापुर्वीही अतुल अगरकर याने श्रीकांत मानेकडुन 20,000 रु व घोगरगांव येथील ईसमाने विधानसभा निवडणुक कालावधीमध्ये 40,000 रु घेतलेले होते.

श्रीकांत माने याने आत्तापर्यंत शिवाजी जरे याला 1,00,000 /-रु,शिवाजी जरे याचा घोगरगाव ता.श्रीगोंदे येथील मित्राला 1,04,000/- रु, अतुल अगरकर याला 3,70,000 रुपये किंमतीच्या बनावट नोटा वितरीत केल्या आहेत. श्रीकांत माने याने दिलेल्या माहीतीवरुन पो.स.ई माळी, पो.ना.वैराळ ,पो.शि. अमोल कोतकर, पो.शि. अमोल शिंदे, पो.शि. संजय कोतकर आशांनी युवराज कांबळे याचा फोटो व फोन क्रमांक घेऊन त्याचे फोनचे लोकेशन घेऊन पुन्हा बारामतीकडे कुच केली व त्याला दिनांक 8 नोव्हेंबर 2019 रोजी त्याचे राहते घरुन ताब्यात घेतला त्याच्याकडे विचारपूस केली.

त्याने नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारे मशिन माझ्या सासुरवाडीत खडकी ता.दौंड येथे असल्याचे सांगितले. तशी माहीती दौंडचे पो.स.ई माळी यांनी स.पो.नि.गावीत यांना कळविली व स.पो.नि.गावीत यांचे पथक श्रीगोंद्याकडुन खडकीकडे रवाना झाले. पोसई माळी व सपोनि गावीत यांचे दोनही पथक खडकी येथे पोहचले. युवराज कांबळे याचा मेहुणा सुमितकुमार भिमराव शिंदे याला संगणकाबाबत विचारपूस केली असता त्याने ते मी ओढ्यामध्ये फेकले आहे अशी पोलीसांनी खोटी माहीती दिली. तेव्हा पोलीसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या पाकीटामध्ये सुद्धा 100/-,200/-,500/- रु दराच्या बनावट नोटांचे एकुण 2200 रु मिळाले व त्यास सुद्धा पोलीसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्यात 9 नोव्हेंबर 2019 रोजी अटक केली आहे.

दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी पुन्हा सपोनि गावीत यांनी सुमितकुमार शिंदे यांच्याकडे तपास सुरु केला तेव्हा त्याने मी ते संगणक व नोटा छापण्याचे कागद व इतर साहित्य पाण्यात फेकून दिलेले नसून ते मी शिवाजी श्रीपती शिंदे रा. खडकी यांच्या घरामध्ये ठेवलेले आहे असे सांगितले.तेव्हा स.पो.नि.गावीत यांचे पथक पुन्हा खडकी ता.दौंड येथे गेले तेव्हा त्यांना शिवाजी श्रीपती शिंदे यांच्या घरामध्ये आरोपी सुमित शिंदे याने ठेवलेले संगणक मिळाले. परंतु नोटा छापण्यासाठी लागणारे कागद व त्या कटींग करण्यासाठी लागणारे इतर मटेरीयल मिळाले नाही तेव्हा शिवाजी श्रीपती शिंदे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मी व अमितकुमार भिमराव शिंदे यांनी ते मटेरीयल बारामती रोडला असलेल्या ओढ्यामध्ये फेकलेले आहे.

तेव्हा पोलीसांनी गोताखोर बोलावुन ओढ्याच्या पाण्यामध्ये त्या साहीत्याचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही म्हणुन अमितकुमार भिमराव शिंदे व शिवाजी श्रीपती शिंदे दोघे रा.खडकी ता.दौंड जि.पुणे यांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला म्हणुन त्यांना दिनांक 9 नोव्हेंबर 2019 रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. शिवाजी रामदास जरे रा.पिंपळगांव पिसा ता.श्रीगोंदे याचा सुद्धा सपोनि गावीत यांच्या पथकाने तात्काळ शोध घेऊन त्याला सुद्धा सदर गुन्ह्यात 10 नोव्हेंबर 2019 रोजी सदर गुन्ह्यात अटक केली आहे.

आत्तापर्यंत श्रीकांत माने याने छापलेल्या बनावट नोटांची कशाप्रकारे विल्हेवाट लावली गेली याचा तपास पोलीस अधिक्षक ईशु सिंधु, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष गावीत, पोसई अमित माळी, विकास वैराळ, अमोल कोतकर, अमोल शिंदे, संजय कोतकर, किरण भापकर, लता पुराणे, दीपाली भंडलकर हे करत असून गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय येथील मोबाईल सेल (दक्षिण विभाग ) येथील पो.शि. प्रशांत राठोड यांनी तात्काळ मदत केली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

श्रीगोंद्यातील गुंडाच्या सहकार्याने नोटा चलनात
नोटा छपाईचा गोरखधंदा सुरू केला तेव्हा पहिल्यांदा त्यांनी 100 रुपये दराच्या नोटा छापल्या व शिवाजी जरे याचा घोगरगाव ता.श्रीगोंदे येथील एका गुंड मित्राच्या मध्यस्थीने त्या खपविण्याचे ठरविले. त्याबाबत शिवाजी जरे याने त्याच्या घोगरगाव येथील मित्राला सुद्धा सर्व खरी माहिती सांगितली व त्याने सुद्धा त्यांच्यामध्ये सहभाग घेतला. आता श्रीकांत माने, युवराज कांबळे, शिवाजी जरे व त्याचा मांडवगण ता.श्रीगोंदे येथील एक मित्र अशा चौघांनी नोटांची छपाई करायची व शिवाजी जरे याचा घोगरगाव येथील गुंड मित्राने त्याची विल्हेवाट लावायची असा यांचा धंदा सुरू झाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!