Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

सहा नगरसेवकांची अनुराधा आदिकांना ‘सोडचिठ्ठी’

Share

विकास कामाबाबत नगराध्यक्षांकडून भ्रमनिरास – अंजुम शेख

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील रखडलेली विविध विकास कामे तसेच एकमेकांच्या जिरवा जिरवीमध्ये शहराची झालेली वाताहत या सर्व कारणांमुळे नगरसेवक अंजुम शेख यांच्यासह सहा नगरसेवकांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. केवळ शहराच्या विकासासाठी जे येतील त्यांच्यासह यापुढे आपली स्वतंत्र भूमिका राहणार असल्याची घोषणा नगरसेवक अंजुम शेख यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

नगरसेवक श्री. शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्वतंत्र भूमिका काल स्पष्ट केली. नगरसेवक अंजुम शेख यांच्यासह राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, जायदा कलीम कुरेशी, जयश्री विजय शेळके, सौ. समिना अंजुम शेख या सहा नगरसेवकांनी आदिक गटाला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र राहण्याची भूमिका जाहीर केली.
अंजुम शेख म्हणाले, शहराला वेठीस धरण्याची परंपरा उदयास येऊ लागली, एकमेकांच्या जिरवा-जिरवीत शहराची वाताहात झाली. प्रत्येक नागरिक राजकारण्यांकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला आहे. केवळ विकासाच्या मुद्यासाठी ससाणे गटापासून दूर होत, आपण नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पालिकेत पाठिंबा दिला. मात्र, आपला भ्रमनिरास झाला. यापुढे कुणाबरोबरही न जाता केवळ शहर विकासासाठी स्वतंत्र भूमिका ठेवू. शहराचे सध्या चाललेले राजकारण शहरासाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ससाणे यांच्या काळात मोठ्या धाडसाने सुरू करण्यात आलेल्या गटारीचे काम यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ही योजना अद्यापही पूर्णत्वास जाऊ शकली नाही. या भूमिगत गटारीचे उत्तरेकडील काम केव्हाच पूर्ण झाले आहे, ते यापूर्वीच सुरू होणे गरजेचे होते.

निळवंडे धरण कालव्यानचे काम पूर्ण झाले तरी शहराला भविष्यात पाणी कमी पडू नये म्हणून स्व. जयंतराव ससाणे यांनी पाणी साठवण तलावाची योजना आखली. त्यासाठी ‘मफ्रा’योजनेंतर्गत 5 कोटी 40 लाख रुपये कर्ज घेण्यात आले. याशिवाय इतरही योजनेतील पालिकेत शिल्लक असलेल्या रकमेतून सदरचे काम पूर्ण करणे काळाची गरज होती. हा निधी परत पाठविण्याबाबत ठराव घेऊन चर्चा झालेली असताना निधी दुसरीकडे वळविण्याचा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून भाजीमंडई नूतनीकरणासाठी शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी आलेला आहे. हा निधी वेळेवर वापरला जाणे गरजेचे असताना त्याचाही अद्याप वापर झाला नाही. भाजी मंडईच्या कामामुळे शहर विकासात भरच पडली असती, ते व्हावे यासाठी आपण नेहमी आग्रही होतो. मात्र, तेथेही वेळकाढूपणा करण्यात आला.

यामुळे शहराची मोठी हानी झाली. स्व. जयंतराव ससाणे यांनी आपल्या विचारांच्या श्रीमंतीतून कल्याण मंडपम नाव वगळून उभारलेल्या गोविंदराव अधिक सभागृहाचे उद्घाटन केले. अद्ययावत असे हे सभागृह किरकोळ तांत्रिक बाबी वरून स्वत: नगराध्यक्षा आदिक गेल्या तीन वर्षापासून आपल्या वडिलांचे नाव असलेले सभागृह खुले करू शकल्या नाहीत. यापेक्षा अधिक विकासाची अपेक्षा त्यांच्याकडून काय करावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आ. भाऊसाहेब कांबळे यांनी शहर विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला, परंतु तीन वर्षाच्या काळात नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी पालिकेच्या माध्यमातून कोणत्याही योजनेसाठी प्रस्ताव तयार करून स्वतंत्र निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ससाणे गटाकडून आदिक गटावर तर आदिक गटाकडून ससाणे गटावर कुरघोड्या करून विकासात प्रचंड अडथळे आणण्यात आले. आपल्यासह माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, संजय फंड, राजेंद्र पवार, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे यांच्यावर राजकीय द्वेषातून केसेस झाल्या.

एकमेकांच्या जिरवा जिरवीत शहर उद्ध्वस्त होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर शहरात कोणी राहायला येणार नाही. गुंतवणूक करण्यास कोणी धजावणार नाही. शहरातील सर्व व्यापारी आज भीतीच्या छायेखाली आहेत. प्रत्येक व्यापारात उलाढाल चिंतेची बनली आहे. बांधकाम व्यवसायात मंदी आहे. केसेसमुळे येथे गुंतवणूक करणारा प्रत्येकजण बांधकाम व्यावसायिकाकडे शंकेच्या नजरेने पाहू लागला. शहरासाठी हे पोषक नाही.
राजकारणात गुरू असलेले स्व. गोविंदराव आदिक तसेच स्व. जयंतराव ससाणे यांच्या विचारसरणीवर आपण आजपर्यंत सूडविरहित राजकारण केले. आदिक, ससाणे यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. त्यांच्याकडे विचारांच्या श्रीमंतीची कुठेच कमी नव्हती. शहराची आता होणारी हेळसांड आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे यापुढे स्वतंत्र अस्तित्व ठेवून विकास करू, असे शेख म्हणाले.

आपली बांधिलकी श्रीरामपूरच्या जनतेशी आहे. शहरात जातीय सलोख्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला. जातीधर्माच्या नावाखाली कधी राजकारण केले नाही. माझी धर्मपत्नी सौ. समीना तसेच मुळा-प्रवरा संस्थेचे ज्येष्ठ संचालक जलीलखान पठाण या आम्हा सर्वांना जनतेचे प्रेम दिले. राजकारणातून चाळीस वर्षापासून समाजकारण करण्याची संधी मिळाली, हे विसरता येणार नाही. रचनात्मक शहर विकासासाठी जे येतील त्यांना बरोबर घेऊन आपण संधीचे सोने करणार आहोत, असे ते म्हणाले.

नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक व आपले बहीण-भावाचे नाते हे राजकारणासाठी नाही. आमच्यात कोणतीही कटुता नाही. हे नाते यापुढेही राजकारण विरहित राहील. शहर विकासाच्या अटींवर आपण त्यांना साथ दिली होती. आपण नात्यापेक्षा नागरिकांच्या समस्या सोडवण्याबरोबर शहर विकासाला अगोदर प्राधान्य देतो, असेही श्री. शेख शेवटी म्हणाले.

राजश्रीताई ससाणेंविरुद्धचा गुन्हा राजकीय द्वेषातून – शेख
भूमिगत गटार भ्रष्टाचार चौकशीस आमचा कोणताही विरोध नाही. आम्हाला कोणाचे समर्थन करायचे नाही. ही प्रशासकीय बाब आहे. प्रशासन अधिकार्‍यांवर ही सर्व जबाबदारी असताना व्यक्तिगत राजश्रीताई ससाणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यास आमचा तीव्र विरोध आहे. अशा खोट्या गुन्ह्यात कुठल्याही राजकीय पदाधिकार्‍यास गुंतवल्यास भविष्यात शहर विकासासाठी कोणीच पुढे येणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

भुयारीच्या गुन्ह्याची माहिती घ्या – खोरे
भुयारी गटार भ्रष्टाचार प्रकरणाचा गुन्हा गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या परवानगीने दाखल झालेला आहे. स्वतःच्या अनधिकृत बांधकामांच्या केसेसची सेटलमेंट व्हावी म्हणून केतन खोरे यांनी भुयारीची केस मागे घ्यावी, यासाठी दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भुयारीच्या गुन्ह्याचा निषेध करून जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला जात आहे. भुयारी गटारीच्या निकालातून सगळे समोर येणार असल्याचा विश्वास केतन खोरे यांनी व्यक्त केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!