Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना : 16 संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षा

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या संसर्गाचा नगर शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला स्वतंत्रपणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीचे सहवासित 4 आणि कमी जोखमीचे सहवासित 4 तसेच जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या आणखी 8 अशा 16 रुग्णाचे नमुने तपासणीसाठी शनिवारी सकाळी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. रविवारी रात्रीपर्यंत या या नमुन्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता.

दरम्यान, रविवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये आणखी दोघांना आणि आधीच्या 20 अशा 22 जणांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे. नगर शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा एक रुग्ण आढळून आला असला तरी त्याची प्रकृती स्थिर असून सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे त्याला आढळून आलेली नाहीत. मात्र, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तत्पर असून या रुग्णाच्या संपर्क आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाची माहिती घेतली असून त्यांची तपासणी करण्यात आली आहे.

इटलीहून आलेल्या एका नागरिकाच्या संपर्कात आलेल्या तीन जण, दुबईहून आलेल्या नागरिकाच्या संपर्कात आलेले आठ जण आणि परदेश दौर्‍याहून आल्यानंतर तपासणी केलेले आठ जण असे 20 जण देखरेखीखाली होते. यात रविवारी दोघांची वाढ करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा रुग्णालय, बूथ हॉस्पिटल येथे स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, शिर्डी येथील साई संस्थानचे हॉस्पिटल आणि शनिशिंगणापूर येथील देवस्थानचे हॉस्पिटल येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी स्व:ताहून काही बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!