Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकरोना विषाणू कधीही नष्ट होणार नाही – जागतिक आरोग्य संघटना

करोना विषाणू कधीही नष्ट होणार नाही – जागतिक आरोग्य संघटना

सार्वमत

नवी दिल्ली – करोना विषाणू कदाचित कधीही नष्ट होणार नाही. अन्य विषाणूंप्रमाणे तोही कायम राहू शकतो. जगाला आता त्याच्यासोबत जगणे शिकावेच लागेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख मायकल जे रेयान यांनी दिला आहे.

- Advertisement -

एचआयव्हीचा विषाणू आजही अस्तित्वात असून, तो नष्ट होऊ शकलेला नाही. परंतु, ज्यांना त्याची लागण झाली त्यांचे उत्तम आरोग्य राखत दीर्घायुष्य कसे लाभेल यासंबंधीचे मार्ग आपण शोधलेत. आता करोना विषाणूचा आजार कधी संपेल, याबाबत आपल्याला ठाऊक नाही. मात्र, या वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे, असे रेयॉन म्हणाले.

मागील वर्षाअखेर चीनच्या वुहान शहरातून करोना विषाणूचा उगम झाला. आतापर्यंत जगभरातील 42 लाख नागरिकांना त्याची बाधा झाली असून, सुमारे तीन लाख जणांचा मृत्यू झाला. करोना विषाणूला रोखण्यात अद्याप कोणत्याही देशाला यश आलेले नाही.

दुसरीकडे त्याचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित आहेत. परिणामी संपूर्ण जगाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली, तर गरिबांची उपासमार होत आहे. अमेरिका, भारत, फ्रान्स, ब्रिटनसह अनेक प्रमुख देशांमध्ये करोना लस शोधण्यासाठी अहोरात्र संशोधन सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या