Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

पुण्यात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. शनिवारी दिवसभरात आणखी तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शनिवारी संध्याकळी 6 वाजेपर्यंत पुण्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची संख्या 29 झाली आहे तर आणखी 27 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 236 वर गेला आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरस रुग्णांच्या मृत्यूची संख्या मुंबई आणि पुण्यात वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाची काळजी वाढलेली आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत रुग्णांना प्राथमिकतेनुसार त्वरित उपचार देण्यावर भर देण्यात आला, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली.

- Advertisement -

रुग्ण काही वेळा रुग्णालयात उशिरा पोचतो. त्यामुळे त्याला त्वरित उपचार देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मुंबई आणि पुण्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे प्रसार त्वरित होतोय. यासंदर्भात प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. रुग्णाचं ड्रेस करून संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते त्यांचं मॅपिंग केलं जातं. यासह इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं आवटे यांनी सांगितलं.

तर कोरोनाव्हायरस संदर्भात सर्वेक्षण करणार्‍यांना धक्काबुक्की केली जात आहे. मात्र हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सर्वेक्षण करत आहे .त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं असल्याचं आवटे यांनी म्हटलं.तर एखादी लस मार्केटमध्ये येण्यासाठी एक ते सव्वा वर्षाचा कालावधी लागतो.या लसीच्या संशोधनासाठी भारतात त्याचबरोबर जगभरात संशोधन सुरू आहे.

जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक सुरळीत सुरु रहावी- डॉ. दीपक म्हैसेकर
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समिती, पुना मर्चंट चेंबर,आडते, हमाल, तोलणार संघटनांच्या पदाधिकार्‍यांबरोबर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी चर्चा केली.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उप्स्तीत होते.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल याबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तु सुरळीत सुरु राहाण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या वस्तूंची वाहतुक रस्त्यात पोलिसांनी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येतील. तसेच आतापर्यंत पोलीस प्रशासनमार्फतही अत्यावश्यक सेवेतील काही ट्रक, टेम्पोचालक यांना पासेस वितरण करण्यात आले आहेत. त्यांना मालवाहतूकीस ये-जा करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची जिल्हा प्रशासन पुरेपुर खबरदारी घेईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांनाही पास देण्यात येतील. परंतु त्या पासचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातील. दररोज ग्रामीण भागातून ये-जा करणार्‍या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ये-जा करणे शक्य नसणार्‍या कामगारांसाठी राहाण्याची, जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल, असेही ते म्हणाले.

भाज्यांचे दर भडकले
कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर उपबाजारही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत भाज्यांचा पुरवठा कमी आहे. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमती चांगल्याच भडकल्या. किलोमागे तीस ते पन्नास रुपयांची दरवाढ झाली. भाज्यांसाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
भाज्यांचे पूर्वीचे दर आणि सध्याचे दर
लसूण – पूर्वी 80-100 आता 160-180
कांदा- पूर्वी 40 आता 45-50 किलो
बटाटा- पूर्वी 30 आता 40-50 किलो
टोमॅटो- 30 किलो आता 40 रुपये किलो
कोथिंबीर- 20 गड्डी आता 40 रुपये
दोडका पूर्वी 40-60 आता 80 रुपये किलो
वांगी 40-50 आता 80 रुपये किलो
भेंडी 60 किलो आता 100 रुपये किलो
गाजर 80 किलो आता 120 रुपये किलो
फ्लॉवर 40 आता 80 रुपये किलो
कोबी-30 आता 80 रुपये किलो
काकडी -60 आता 80 रुपये किलो
मिरची- 40 किलो आता 80 रुपये किलो

- Advertisment -

ताज्या बातम्या