Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 1982 करोनाग्रस्त; आज दिवसभरात 22 मृत्यू, 221 नवे रुग्ण

महाराष्ट्रात 1982 करोनाग्रस्त; आज दिवसभरात 22 मृत्यू, 221 नवे रुग्ण

सार्वमत

मुंबई – महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज दिवसभरात 221 करोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत 16 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत 91 रुग्णांचा करोनानं बळी गेला असून, राज्यातील आकडा 149 वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा 1982 आकडा वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत 22 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात सर्वाधिक 16 रुग्ण मुंबईचे आहेत. पुण्यातील तीन, नवी मुंबईचे दोन आणि सोलापूर येथील एक मृत रुग्णाचा समावेश आहे. यामुळे करोनाबाधित रुग्णांची राज्यातील मृत्यूची एकूण संख्या 149 इतकी झाली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिग जमातच्या बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक इज्तेमात महाराष्ट्रातील ज्या नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून, राज्यात अशा व्यक्तीपैंकी 37 जण करोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
निजामुद्दीन मरकजसंबंधित लातूरमध्ये आठ, यवतमाळ येथे सात, बुलढाणा जिल्ह्यात सहा, मुंबईत तीन तर प्रत्येकी दोन जण पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशिममध्ये प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित आहे. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील सहा जण अहमदनगर येथे तर एक जण पिंपरी चिंचवडमध्ये करोनाबाधित आढळला आहे.

राज्यात एकूण रुग्ण संख्या 1 हजार 982 झाली आहे. 217 करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले असून, 1 हजार 982 जण करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5 हजार 064 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

आज राज्यात 22 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईचे 16 जण आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एक जण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्युमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरियादेखील होता. करोनामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 149 झाली आहे, असेही टोपे म्हणाले.

जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका 1 हजार 298 (मृत्यू 92),
ठाणे 06, ठाणे मनपा 44 (मृत्यू 03),
नवी मुंबई मनपा 45 (मृत्यू 03),
कल्याण डोंबवली मनपा 46 (मृत्यू 02),
उल्हासनगर मनपा 01,
भिवंडी निजामपूर मनपा 01,
मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू 01),
पालघर 04 (मृत्यू 01),
वसई विरार मनपा 21 (मृत्यू 03),
रायगड 04, पनवेल मनपा 08 (मृत्यू 01),
ठाणे मंडळ, एकूण 1 हजार 520 (मृत्यू 106),
नाशिक 02, नाशिक मनपा 01, मालेगाव मनपा 15 (मृत्यू 02),
अहमदनगर 10, अहमदनगर मनपा 16,
धुळे 01 (मृत्यू 01), जळगाव 01, जळगाव मनपा 01 (मृत्यू 01),
नाशिक मंडळ, एकूण 47 (मृत्यू 04),
पुणे 07, पुणे मनपा 233 (मृत्यू 30), पिंपरी- चिंचवड मनपा 23,
सोलापूर मनपा 01 (मृत्यू 01), सातारा 06 (मृत्यू 02),
पुणे मंडळ एकूण 270 (मृत्यू 33), कोल्हापूर 01, कोल्हापूर मनपा 05,
सांगली 26, सिंधुदुर्ग 01, रत्नागिरी 05 (मृत्यू 01), कोल्हापूर मंडळ, एकूण 38 (मृत्यू 01),
औरंगाबाद 03, औरंगाबाद मनपा 16 (मृत्यू 01), जालना 01, हिंगोली 01, औरंगाबाद मंडळ, एकूण 21 (मृत्यू 01),
लातूर मनपा 08, उस्मानाबाद 04, बीड 01, लातूर मंडळ, एकूण 13,
अकोला मनपा 12, अमरावती मनपा 05 (मृत्यू 01), यवतमाळ 04,
बुलढाणा 13 (मृत्यू 01), वाशिम 01, अकोला मंडळ, एकूण 35 (मृत्यू 02),
नागपूर 01, नागपूर मनपा 27 (मृत्यू 01), गोंदिया 01, नागपूर मंडळ, एकूण 29 (मृत्यू 01),
इतर राज्ये 09 (मृत्यू 01),
एकूण 1 हजार 982 (मृत्यू 149).

- Advertisment -

ताज्या बातम्या