Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेश14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे हटवणार नाही ; पंतप्रधान मोदींनीच केले स्पष्ट

14 एप्रिलनंतर लॉकडाउन पूर्णपणे हटवणार नाही ; पंतप्रधान मोदींनीच केले स्पष्ट

सार्वमत

नवी दिल्ली – कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवला जाणार की संपणार याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पंतप्रधानांसोबत बैठकीत सहभागी झालेल्या बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. पंतप्रधानांनी 14 तारखेनंतर लगेचच पूर्णपणे लॉकडाउन हटवणार नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नरेंद्र मोदींनी बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेत पाचपेक्षा जास्त सदस्य असणार्‍या संसदेतील नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी सर्वांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे यासंबंधी माहिती दिली. यावेळी नेत्यांनीदेखील नरेंद्र मोदींना राज्यांमध्ये निर्माण होणार्‍या समस्यांची माहिती दिली. तसंच त्यांचा सामना करण्यासाठी अजून साधन संपत्ती उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. खासकरुन सर्व नेत्यांनी स्थलांतरित कामगारांचा मुद्दा उपस्थित केला.

- Advertisement -

या बैठकीत काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय, शिवसेना नेते संजय राऊत, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, बीएसपी नेता सतीश चंद्र मिश्रा, जेडीयूचे राजीव रंजन सिंह यांच्यासोबत इतरही नेते उपस्थित होते.
पिनाकी मिश्रा यांनी सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलनंतर एकाच वेळी पूर्णपणे लॉकडाउन हटवला जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तसंच कोरोनाच्या आधीचं आणि नंतरचं आयुष्य सारखं नसणार आहे असंही मोदींनी म्हटलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पंतप्रधान 11 एप्रिलला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 एप्रिलला म्हणजेच शनिवारी देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी ते महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. आता 14 एप्रिल ही तारीख जवळ येते आहे. त्या पार्श्वभूमीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या