Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदेशात 24 तासांत 195 करोनाबाधितांचा मृत्यू

देशात 24 तासांत 195 करोनाबाधितांचा मृत्यू

सार्वमत

नवी दिल्ली – देशात करोनामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक 195 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, 3 हजार 900 संसर्गग्रस्तांची नव्याने भर पडली. आतापर्यंत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत संसर्गग्रस्त आढळून आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

सोमवारी जवळपास 1 हजार 20 रूग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत देशातील 12 हजार 726 रूग्ण संसर्गातून पूर्णत: बरे झाले असल्याने रिकव्हरी रेट 27.41 टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. देशातील रूग्णसंख्या 46 हजार 433 च्या घरात पोहोचली असून 32 हजार 138 अ‍ॅक्टिव केस आहेत. तर1 हजार 568 रूग्णांचा संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, असे मंत्रालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समूहाची 14वी बैठक नुकतीच पार पडली. देशातील वैयक्तिक सुरक्षा किट (पीपीई), एन-95 मास्क, पायाभूत सुविधा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडर तसेच वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर बैठकीत चर्चा झाली. करोना संबंधी नागरिकांना वेळोवेळी जागरूक करण्यासह त्यांना अलर्ट ठेवण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपच्या वापराला प्रोत्साहन देण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी बिहारच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काही राज्यांनी रूग्णांच्या ट्रेसिंगला वेग देण्याची आवश्यकता असल्याचे अग्रवाल म्हणाले. करोनासह इतर रूग्णांनाही वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. हा काळ डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांचा आहे. अशात सरकारी तसेच खासगी रूग्णालयांनी सर्व रूग्णांना वैद्यकीय सुविधा मिळेल यासंबंधी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोना तसेच नॉन करोना रूग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍यांना पीपीई किटच्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सूचनांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन यानिमित्ताने मंत्रालयाकडून करण्यात आले.

दरम्यान लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात कार्यालयीन कामकाज सुरु करण्यात आल्यामुळे गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कार्यस्थळावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायजर, हॅन्डवॉश तसेच फेस मास्क मु्बलक प्रमाणात उपलब्ध करवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यस्थळी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या वेळेवर कर्मचार्‍यांना जेवणाची सुट्टी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य सेतू अ‍ॅपडाऊन लोड करणे आवश्यक असल्याचेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. कार्यालयाला वेळोवेळी सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. तसेच नजीकच्या करोना रूग्णालयांची तसेच क्वारंंटाईन केंद्रांची यादी लावणे बंधनकारक असेल.

देशभरात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यासह प्रत्येकांनी 2 फूटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, गुटखा, तंबाखू सेवनावर बंदी घालण्यात आली आहे. दुकानात एकाचवेळी 5 हून अधिक लोकांना उभे ठेवता येणार नाही. संघटनांना देखील 5 हून अधिक कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याची परवानगी नाही. लग्नसमारंभात 50 हून अधिक तसेच अंत्यविधीत 20 हून अधिक नागरिकांनी एकत्र येवू नये असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

जीवनशैलीत बदलाची गरज – जगातील सर्व देशांमध्ये करोना पोहोचला आहे. पंरतु, या करोना विरोधी युद्धात लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यावर नागरिकांना सामाजिक जबाबदारीचे योग्यरित्या वहन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी त्यांची जीवनशैली तसेच काम करण्याच्या पद्धतीत करोना संबंधी आवश्यक सुधारणा आणाव्या लागतील. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व नागरिकांच्या मदतीची आवश्यकता आहे, असे अग्रवाल म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या