राज्याच्या शहरी भागातील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद

राज्याच्या शहरी भागातील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती

मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात दहावी आणि बारावीसह नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा सुरू राहतील.

दरम्यान, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. राज्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात निवेदन करताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.

राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे.

राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायिक, यात्रा, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. सरकारच्या आदेशात आजारी असणार्‍या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांपासून लांब ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची दक्षता घेण्यास प्रधान सचिव व्यास यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com