Friday, April 26, 2024
Homeनगरकोरोनाने पाय पसरले…

कोरोनाने पाय पसरले…

34 बाधित, पंतप्रधान अ‍ॅक्शनमोडवर

नवी दिल्ली – शनिवारी 3 रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आल्याने धोका अधिकच वाढला असून रूग्णांची संख्या 34 वर पोहचली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अ‍ॅक्शनमोडवर आले असून जगभरात या विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भातील देशातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी शनिवारी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि सूचनाही केल्या. या बैठकीला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, आरोग्य राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे आणि इतर उच्चाधिकारी उपस्थित होते. मोदी अधिकार्‍यांना म्हणाले, कोरोनाचे संशयीत रुग्ण सापडल्याच्या जागा निश्चित करा आणि अशा संशयीतांना वेगळं ठेवण्यासाठी पुरेशा सुविधा तयार करा. त्याचबरोबर जर हा विषाणू पसरण्याची भीती असल्यास त्या ठिकाणी अतिदक्षता विभागाची निर्मितीही करा.
………
गर्दी टाळा!
मोदी म्हणाले, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसेच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी काय करावं काय करु नये याबाबत सतर्क रहावं, याबाबत जनजागृती करण्यात यावी. दरम्यान, या परिस्थितीवर मात करण्यासाठी देश तयार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन पुढे ढकलले

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन 13 मार्चला अलिबागमध्ये होणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह अनेक मंत्री या अधिवेशनाला उपस्थित राहणार होते. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एक ते दीड लाख शिक्षकांची उपस्थिती असणार्‍या या अधिवेशला कोरोना व्हायरस झटका बसला आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी नको, कोरोनाची भीती यामुळे हे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघाच्या वतीने या त्रैवार्षिक अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यात आली होती.  यासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकाराने शिक्षकांना 9 ते 14 मार्च दरम्यान ऑनड्यूटी रजा मंजूर केली होती. ऑनड्यूटी रजेमुळे अधिवेशनाच्या नावाखाली प्राथमिक शिक्षकांना कोकणवारी वारी करता येणार होती. राज्य सरकार प्रमाणे नेते आणि मंत्र्यांनी कोरोनाचा धसका घेतल्याने शिक्षक संघाचे अधिवेशन स्थगित करण्यात आले आहे. ऑनड्यूटी कोकणवारीला मुकणार असल्याने अनेक गुरूजींचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यातून अधिवेशनासाठी सुमार 5 ते 6 शिक्षकांनी तयारी केली असल्याची माहिती शिक्षक संघाचे नाशिक विभागाचे प्रमुख आबासाहेब जगताप आणि गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दिली.

राज्यातील यात्रांवर टांगती तलवार

मुंबई – दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या पाहता देशाच्या इतर भागांमध्ये सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आयोजित होणार्‍या यात्रांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र जमणार नाहीत, याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी लोकांना मेळावे आणि यात्रांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या राज्यभरातील यात्रा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या यात्रा सुरु आहेत. यानिमित्ताने ग्रामीण भागात पर्यटकांची आणि चाकरमन्यांची ये-जा होते. या सगळ्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला काहीप्रमाणात का होईना, चालना मिळण्याचे काम होते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे बहुतांश यात्रा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्र सरकारनेही कोरोनाचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरु केली होती. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील निवडक रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी स्वतंत्र (आयसोलेटेड) कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा पातळ्यांवर कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या