कोरोना महामारी : युवा शेतकऱ्याने आपला पिकविलेला गहू दिला गरिबांसाठी

कोरोना महामारी : युवा शेतकऱ्याने आपला पिकविलेला गहू दिला गरिबांसाठी

नाशिक । विजय गिते

अस्मानी,सुलतानी अशा एकामागून एक संकटांनी बळीराजा हैराण झालेला आहे.त्यात दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे आता करोना या विषाणूजन्य रोगाने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही,अशाही परिस्थितीत शेतकरी स्वतःचे नुकसान सोसत गरिबांना मदत करण्यास नेहमीच पुढे येत आहे.याचेच एक उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथील दत्ता रामराव पाटील भंडारे या युवा शेतकऱ्याने आपला पिकविलेला गहू गरिबांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

शेतकरी आणि निसर्ग यांचे अतूट नाते असले तरी निसर्गाकडून शेतकऱ्यांना जसे भरभरून दिले जाते, तसेच कधी कधी निसर्गाकडून येणारे नुकसानही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सोसावे लागते. कधी अवकाळी पाऊस तर कधी कमी पाऊस परिणामी दुष्काळ अशा परिस्थितीला सामोरे जात शेतकरी आपला शेतमाल पिकवतात.

मात्र, या नैसर्गिक नुकसानी बरोबरच म्हणजेच अस्मानी संकट त्यानंतर सुलतानी संकट अशा दोन्ही संकटांना शेतकरी नेहमीच आपले तोंड देतो.अशा दुहेरी संकटात आता करोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगभर धुमाकूळ घालून दिला असून याचा फटका शेतमालाला परिणामी शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. याबरोबरच रोजंदारीने काम करणारे हातावरच्या मजुरांनाही करोना या विषाणूजन्य रोगाचा मोठा फटका बसला आहे.कुठेही हाताला सध्या काम मिळत नसून संचारबंदीमुळे ही वेळ आली आहे .

अशा परिस्थितीत रोजचे खाण्यापिण्याचे हाल मजूर वर्गाचे आता होऊ लागले आहे.अशा परिस्थितीत या मोलमजूरी करणाऱ्यांची चींता कसबे सुकेने ता. निफाड येथील दत्ता रामराव पाटील भंडारे या तरुण शेतकऱ्यांला आली.या तरुण शेतकऱ्याने मजुरांना आपल्या एक एकर जमिनीमध्ये पिकविलेला गहू या तरुण शेतकऱ्याने या कष्टकरी गरीब लोकांना उपलब्ध करून दिला आहे. या शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे मोल मजुरांना शेर दोन शेर गव्हाची मदत होऊ लागल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्वांनी एकमेकांना मदत करा-भंडारे

माझ्याकडे एक कष्टकरी महिला आपल्या बाळाला घेऊन आली आणि दत्ताभाऊ काही शिळे पाके असेल तर आम्हाला द्या,अशी माझ्याकडे विनंती केली.हे ऐकून मला रात्रभर झोप आली नाही.कष्टकऱ्यांना काहीही खायला मिळत नाही.रस्त्याच्या पलीकडे मोलमजुरी करणारे उपाशीपोटी आहे आणि आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये गव्हाची रास तशिच पडलेलली आहे.त्यामुळे मला विचार आला की आपण हा गहू या कष्टकरी मजदुरांना देऊया. म्हणून आपण तो त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.मी काही फार मोठा शेतकरी नसून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा गहू कष्टकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.अशीच मदत प्रत्येकाने करावी,म्हणजे देश पुढे जाईल .

दत्ता रामराव पाटील (भंडारे),कसबे सुकेणे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com