Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुंबई पोलिसांना सुट्टी तर पुणे पोलिसांना...

55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुंबई पोलिसांना सुट्टी तर पुणे पोलिसांना फिल्डवरील डयुटी नाही

सार्वमत

मुंबई – मुंबईतील तीन कर्मचार्‍यांचा करोनामुळं मृत्यू झाल्यानंतर तेथील पोलीसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांना घरीच थांबण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. तर ज्या पोलीस कर्मचार्‍यांचे वय 52 पेक्षा अधिक आहे आणि त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, अशांनाही घरीच राहण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत असून, राज्यातील पोलीस दल अविरत सेवेत आहे. पोलीस दलातील कर्मचारी धोका पत्करून दिवस-रात्र लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झटत आहेत. कर्तव्य बजावताना मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबई पोलीस दलातील तिघांचा करोनामुळं मृत्यूही झाला आहे. त्यामुळं आता खबरदारी म्हणून, पोलीस आयुक्तांनी 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर 52 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आणि मधुमेह, रक्तदाब आदी आजार असलेल्या कर्मचार्‍यांनाही सुट्टी दिली आहे. 3 मे पर्यंत सर्व पोलीस ठाण्यांतील कर्मचारी 12 तास ड्युटीवर असतील. उपनगरांतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आधीपासूनच अशा प्रकारे यंत्रणा कार्यरत आहे. आमचे पोलीस अधिकारी-कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून या शहराचं संरक्षण करत आहेत. त्यांचं आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे, असं पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं.

पुण्यात 50 वर्षांपुढील पोलीसांना फिल्डवरील डयुटी नाही
पुणे – पुणे पोलीस विभागातील 8 जणांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची विशेष काळजी घेतली जात असून आम्ही आठवड्याभरापूर्वीच 50 वर्षांपुढील पोलीस कर्मचार्‍यांना फिल्डवरील डयुटी देणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
तसेच ज्या पोलीसांना मधुमेह आहे, लहान मुले असलेल्यांना आणि गर्भवती महिला पोलीसांनाही फिल्डवरील ड्युटी दिली जाणार नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत, अशा कर्मचारी वर्गाला रजेवर पाठविण्यात आले आहे. एखादा कर्मचारी भविष्यात करोना बाधित आढळल्यास किंवा लक्षणे दिल्यास, अशावर उपचार करण्यासाठी दीनानाथ मंगेशकर आणि सिम्बॉयसिस रुग्णालयामध्ये पोलीस कर्मचारी वर्गासाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहेत असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या