Thursday, April 25, 2024
Homeनगरअधिवेशनाच्या तोंडावर प्रशासन थंडच !

अधिवेशनाच्या तोंडावर प्रशासन थंडच !

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय विभागांत शांतता

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाचे आजपासून (सोमवार) नागपूरला अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा आरोग्य विभाग, सहकार विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात शांतता होती. यंदा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे अधिवेशनापूर्वीचे वातावरण थंडच असल्याचे दिसून आले. यामुळे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

- Advertisement -

विधिमंडळाचे अधिवेशन आंदोलकांचा हक्क असे समिकरण तयार झालेले आहे. रखडलेल्या प्रश्नांसाठी आंदोलक या अधिवेशनाची वाटच पाहत असतात. अधिवेशनाची तारीख जाहीर होण्यापासूनच आंदोलक आंदोलनाच्या तयारीत असतात.अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसापासूनच आंदोलने धडकण्यास सुरुवात होते. प्रशासकीय पातळीवरही अधिवेशनाची जोरदार तयारी असते. अधिवेशनात जिल्ह्यातील विविध प्रश्न उपस्थित केले जात असतात. आंदोलनांसाठी बंदोबस्त द्यायचा असतो. त्यांची माहिती द्यायची असते. त्यामुळे अधिवेशनापूर्वी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचीही मोठी धावपळ सुरू असते. यावर्षी तुलनेत प्रशासनावरही फारसा ताण नसल्याचे दिसून येते.

यावेळचे आंदोलन वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी नेहमीप्रमाणे बाहेरील आंदोलनांपेक्षा सभागृहांतील कामकाजातूनच अधिवेशन गाजण्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात येते. मुंबईतील अधिवेशनात विश्वास ठराव जिंकला असला, तरी कामकाजासंबंधीची नव्या सरकारची पहिली कसोटी या हिवाळी अधिवेशनात लागणार आहे. त्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय तयारीच्या पातळीवर फारशी धावप्ळ नसल्याचे दिसून येते. नव्या सरकारचे पहिलेच अधिवेशन असल्याने काही दिवस संधी देण्याच्या उद्देशाने आंदोलकांनी थांबण्याचे ठरविले असल्याचीही शक्यता आहे. पहिल्या अधिवेशनाच्या तोंडावर एवढी शांतता असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील एका अधिकार्‍याने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या