Friday, April 26, 2024
Homeनाशिकजि.प.बांधकाम विभागात ठेकेदारांत बाचाबाची;दोन ठेकेदारांमध्ये फ्रीस्टाईल

जि.प.बांधकाम विभागात ठेकेदारांत बाचाबाची;दोन ठेकेदारांमध्ये फ्रीस्टाईल

फाईलमधील कागद फाडाफाडीपर्यंत गेले प्रकरण

नाशिक – 

जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि वादंग हा नेहमिचाच विषय झालेला आहे.या विभागातील निविदांवरून प्रशासन आणि ठेकेदार याच्यांमध्ये होणारे वादंग टाळण्यासाठी स्वतंत्र ई-निविदा कक्ष उभारले खरे. मात्र,येथील वाद अजुनही संपायचे नाव घेत नसल्याचे बुधवारी (दि.5)पुन्हा एकदा समोर आले.

- Advertisement -

निविदा कक्षातच दोन ठेकेदार समोरासमोर आले अन एकमेकांना भिडले.दोघांमध्ये फ्रीस्टाईल झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात होती.हा प्रकार पोलिसापर्यंत पोहचल्याचे कळते.सकाळी हा प्रकार घडतो न घडतो तोच,सायंकाळी कार्यालय सुटण्याची वेळ झाली त्या सुमारास बांधकाम विभाग एकमध्ये ठेकेदार अन अधिकार्‍यांमध्ये बाचाबाची झाली.हे प्रकरण फाईलमधील कागद फाडाफाडीपर्यंत गेल्याची चर्चा आहे.दरम्यान,इतर ठेकेदारांनी मध्यस्ती करत या वादावर पडदा टाकत प्रकरण मिटवेले.

जिल्हा परिषद मुख्यालयातील बांधकाम,लघुपाटबंधारे विभागामध्ये ठेकेदारांची सततची वर्दळ असते.या विभागांत ठेकेदारांमध्ये काम देण्याघेण्यावरून नेहमिच ं वाद, हाणामारी,फाईल पळविण्या असे प्रकार वारंवार घडतात.या प्रकारावर आळा घालण्यासाठी अन बांधकाम विभागातील होणारी ठेकेदारांची गर्दी कमी होण्यासाठी मुख्यालयात स्वतंत्र ई-निविदा कक्ष स्थापन करून कार्यरत झालेला आहे.मात्र,या कक्षालाही हाणामारी,वाद सुरू झाले आहेत.

बुधवारी ई-निविदा कक्षात दोन ठेकेदार एकमेकांसमोर कामनिमित्त आले असता दोघांमध्ये वाद झाले. एकमेकांवर हात उचलत दोघांनाही हाणामारी केल्याची चर्चा आहे. जुन्या वादातून हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. यात एकमेकां विरोधात तक्रारी झाल्याचे समजते.

हा वाद शमत नाही तोच, सायंकाळी बांधकाम विभाग क्रमांक एकमद्ये ठेकेदार व अधिकारी यांच्यात फाईल काढण्यावरून हमरीतुमरी झाली. हा वाद टोकाला गेल्यामुळे ठेकेदारांने थेट फाईलमधील कागद फाडल्याची चर्चा आहे.यावर संबधित अधिकार्‍यांनेही ठेकेदारांविरोधात लेखी तक्रार करण्याची भाषा केली.यावेळी इतर ठेकेदार व अधिकारी, सेवकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटविल.या प्रकारामुळे जिल्हा परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

प्रशासनाची भूमिका बघ्याची

निविदा कक्षा शेजारीच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय आहे.मात्र,या कक्षात हा प्रकार झाल्याचे कार्यालयापार्यंत पोहचले नसल्याचे सांगण्यात येते. शेजारी अधिकारी असूनही त्यांच्या कार्यालयाबाहेर ठेकेदार एकमेकांमध्ये भिडतात मात्र, यावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे समोर आले.दिवसभरातही या प्रकाराची साधी दखलही घेण्यात आली नाही. बांधकाम विभागातही कार्यकारी अभियंता कार्यालयात उपस्थित असताना, कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अशा प्रकारावर प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या