वाहन टोईंगसाठी मिळेनात ठेकेदार सध्याच्या ठेकेदाराला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0

नाशिक | दि. २१ प्रतिनिधी – नो पार्किंगमध्ये पार्क केलेल्या मोटारसायकलसह मोठी वाहने हटवण्यासाठी अत्याधुनिक वाहनांची अट असल्याने यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या टेंडर प्रक्रियेत निकषांची पूर्तता करणारे ठेकेदारच मिळाले नसल्याने पोलिसांनी पुन्हा टेंडर प्रसिद्ध केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महिनाभराचा कालावधी जाणार असल्याने डिसेंबरपर्यंत पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात वाढत चाललेली वाहने तसेच त्यांचे बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असून ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांपूर्वी टोईंग व्हॅन सुरू करण्यात आली होती. मात्र यासाठी वापरण्यात येणार्‍या साध्या क्रेन तसेच पद्धतीमुळे चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. यामुळे प्रारंभीच अवघ्या दोन महिन्यांत चारचाकी वाहने उचलण्याचे काम बंद झाले होते.

दुचाकी उचलण्याचे काम सुरू राहिले. मात्र यातदेखील अप्रशिक्षित कर्मचारी दुचाकी हाताळताना नुकसान करीत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी पोलीस आयुक्तांकडे येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईप्रमाणे यंत्रणा राबवण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतला होता. अत्याधुनिक साधनांमुळे वाहनचालकाचे नुकसान होणार नाही.

तसेच टोईंग व्हॅनची संख्या मुबलक असल्यास रस्त्यावर वाहने पार्क झाल्याबरोबर कारवाई होऊ शकते. यासाठी पोलिसांनी टेंडर नोटीस प्रसिद्ध केली होती. साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन वाहने पूर्ण सुविधांसह रस्त्यावर येणे अपेक्षित होते. या टेंडर प्रक्रियेत नाशिकसह मुंबईतील मिळून सात ठेकेदारांनी रस दाखवला.

मात्र वाहनात सीसीटीव्ही बसवणे, आधुनिक हायड्रोलिक सिस्टीम बसवणे अशा अटींची पूर्तता करण्यासाठी या ठेकेदारांनी असमर्थता दर्शवली. यामुळे या कामाची फेर निविदा काढण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहेे. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी ही निविदा प्रसिद्ध केली असून डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील वर्षी वाहतूक पोलीस विभागाच्या मदतील टोईंगसाठी अत्याधुनिक सुविधा असलेली वाहने उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे आधुनिक पार्किंग उभी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. असे झाल्यास शहरातील पार्किंग तसेच वाहतुकीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*