भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला

0
नगर-पुणे महामार्गावरील घटना : जीवितहानी नाही; सलुनचे दुकान नेस्तनाबुत
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातून जाणार्‍या नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथील एका हॉटेलमध्ये भरधाव कंटेनर घुसल्याने मोठे नुकसान झाले. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडला. या प्रकाराने महामार्गालमतच्या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नगरहून-पुण्याकडे जात असलेला कंटेनर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरने त्या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला धडक देत शेजारीच असलेले छोटेशे सलूनचे दुकान नेस्तनाबूत केले. तसेच मागच्या बाजूस एक घर आहे, त्या घराच्या कंपाऊंडची भिंतदेखील या कन्टेंनरच्या धडकेत पडली. या सर्व प्रकाराने आजूबाजूचे रहिवाशी प्रचंड घाबरून गेले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
ज्या हॉटेलमध्ये हा कंटेनर घुसला त्या ठिकाणी सकाळच्या वेळेस चहा पिणार्‍यांची नेहमी गर्दी असते. मात्र अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी तीन ते चार लोक होते. कंटेनर आपल्या दिशेने येत असल्याचे दिसताच त्यांनी दुसर्‍या दिशेने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र भरधाव कंटेनरने शेजारचे सलूनचे दुकान नेस्तनाबूत केले. हे दुकानही बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात चालकाविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*