Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

विखेंना काँग्रेसकडून नोटीस

Share

आज विखेंचा निर्णय : कुरघोड्यांची मालिका कायम

अहमदनगर (प्रतिनिधी)- राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेले राजकीय नाट्य दुसर्‍या दिवशीही कायम होते. सेना उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी विखेंना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगीतले. दरम्यान, आज शनिवारी विखे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यापूर्वी राजकारण तापले आहे. या मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात राज्यातील नेत्यांच्या सभांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. सोबतच राजकीय कुरघोड्याही सुरू आहेत. एकमेकांना शह देण्याचा राजकीय खेळ सुरू आहे. विखेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ते अद्याप पक्षात कायम असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र विखेंनी शिर्डी मतदारसंघात सेना उमेदवारासाठी बैठका व प्रचार सुरू करून काँग्रेसवर टीका सुरू केल्यानंतर आता पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अद्याप पक्षात असताना त्यांची ही भुमिका अनुचित आहे. शुक्रवारी रात्रीच त्यांंना नोटीस पोहचलेली असेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिल्याचे वृत्तवाहीनीने म्हटले आहे.

तत्पूर्वी सेना उमेदवाराच्या प्रचार बैठकीत बोलताना आपण कारवाईला घाबरत नाही, असे विखे म्हणाले. त्यांनी दोन दिवसांपासून शिर्डी मतदारसंघात सेना उमेदवारासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. पुत्र डॉ.सुजय यांच्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश राजकीय वर्तुळाने गृहीत धरला आहे. श्रीरामपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पालकमंत्री राम शिंदे यांनी त्यांच्या भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या प्रवेशाच्या चर्चेने उचल खाल्ली. मात्र हा बहुप्रतिक्षीत प्रवेश कधी होणार, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही. शनिवारी विखे यांनी लोणी येथे माध्यमांना पत्रपरिषदेचे निमंत्रण दिले आहे. यावेळी ते काय घोषणा करणार याचीही उत्सुकता वाढली आहे. नगर लोकसभा मतदारसंघानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व महायुतीच्या नेत्यांनी शिर्डीकडे मोर्चा वळविल्याने अखेरच्या टप्प्यात प्रचार आणि कुरघोड्या शिगेला आहेत.

सामना रंगतदार
शिर्डी मतदारसंघात थोरात विरूद्ध विखे असा राजकीय सामना सुरू झाला आहे. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आ.बाळासाहेब थोरात यांच्या मागे ताकद उभी केली आहे. राहुल गांधी, शरद पवार, मल्लीकार्जुन खर्गे, छगन भुजबळ, ना.धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे आदींनी थोरातांमागे ताकद लावली आहे. तर दुसरीकडे विखेंच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ना.गिरीश महाजन यांनी ताकद लावली आहे. यामुळे हा राजकीय सामना रंगतदार झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!