संघर्षाचे आव्हान काँग्रेसला पेलणार?

0

आँखो देखी – अनंत पाटील, मो. 9822020502

अहमदनगर – मंगळवारी ‘जनआक्रोश’च्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचा मेळावा अहमदनगर शहरात भरला होता. नेत्यांनी या मेळाव्यात पक्षाची परंपरा जागवली. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेप्रती कणव प्रकट केली.
सत्तेतून बेदखल झाल्यावर का असेना सामान्य माणसाचा आवाज काँग्रेस नेत्यांच्या कानात पोहचला, हे काय कमी आहे? याच मेळाव्यात पक्षाने 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या दिशेने अप्रत्यक्षपणे पाऊल टाकले. पण काँग्रेसला हे आव्हान पेलणार का? हा कळीचा मुद्दा आहे!
भाजपच्या लाटेत गर्भगळीत झालेल्या काँग्रेसमध्ये अलीकडे धुगधुगी पेटली आहे. देशात नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था भरडली गेली. त्याचा फटका सामान्य जनतेला बसला. इकडे राज्यात शेतकर्‍यांचे प्रश्‍न आणि कर्जमाफीचा सरकारने खेळ करून टाकला. काम कमी आणि वाजा मोठा, हे भाजपाचे धोरण आता जनतेच्याही लक्षात आल्याने सरकारविरोधी सूर तयार झाला.
सोशल मीडियाने तर सरकारची यथेच्छ टिंगल उडवली. यामुळे दचकलेल्या भाजप सरकारला सोशल मीडियावर अघोषित आणीबाणी लागू करावी लागली. हे वातावरण आपसूक विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडणारे! काँग्रेसला इंधन पुरवणार्‍या या घडामोडी सुरू असताना आंतर्बाह्य बदललेले राहुल गांधी समोर आले. त्यांना हिणवण्यापूर्वी भाजपाला आता चारदा विचार करावा लागतो, यातच या बदलाचे रहस्य दडलेले! बहुधा यामुळेच राज्यातील काँग्रेसला ‘जनआक्रोश’ सुचले असावे!
गेले तीन वर्षे राज्यात विरोधी पक्षाची जागा सत्तेतील शिवसेना भरून काढत होती. आता ती जागा भरून काढण्याची
इच्छा काँग्रेसमध्ये जागी झाली असेल तर तो मोठा बदल म्हटला पाहिजे. सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडायला एवढा वेळ का लागला, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. पण काँग्रेस पक्ष विरोधी पक्षासारखा वागू लागला, हेही नसे थोडके!
नगरचा जनआक्रोश मेळावा याचीच साक्ष देत होता. मेळाव्याला पदाधिकारी आले आणि हेवेदावे विसरून नेत्यांनी हजेरी लावली, ही जमेची बाजू! विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर हा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी होती. त्यांनी गेले काही दिवस मेळावा यशस्वी व्हावा म्हणून कंबर कसली. त्यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे यांनी मेळावा व्यवस्थापनाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती.
त्यामुळे मेळाव्यावर विखेंचे वर्चस्व ओघानेच होते. अपेक्षित गर्दी, काटेकोर नियोजन आणि सरकारविरोधात नेत्यांच्या भाषणांतून उमटलेला ‘जनआक्रोश’ या पातळीवर मेळावा काँग्रेसला लाभदायक ठरला, यात दुमत नसावे! पण याशिवाय अन्य काही बाबी आहेत, ज्या नजरेतून सुटणे अशक्य! या मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेस एकसंध झाली की नाही, हे तपासून पहावे लागेल.
परंपरेने नगर जिल्ह्यातही काँग्रेसचे दोन गट! एक राधाकृष्ण विखेंचा, दुसरा बाळासाहेब थोरातांचा. जनआक्रोश व्यक्त करतानाही या गटांनी आपले ‘वेगळेपण’ जपले! नगर शहरासह मेळावा स्थळावर लागलेले फलक याची साक्ष देत होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न हे फलक करत होते.
काहींवर झळकत होते डॉ. सुजय विखे तर काहींवर होते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे! पक्ष संघटनेत काडीचाही संबंध नसलेल्या काही उपटसुंभांनीही नगर शहरात मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या तस्वीरी झळकावून घेतल्या. काही बहाद्दर तर ‘समन्वयक’ वगैरे बिरूद लावून मेळावा आपणच घडवल्याच्या अविर्भावात होते.
मेळाव्याला आ. बाळासाहेब थोरात जरा उशिरानेच आले. त्याची कुजबुज झालीच! काही विखे समर्थकांनी ते गुजरातमध्ये असावेत, असा ग्रह करून घेतलेला. त्यांच्यासाठी ही स्थिती तशी बरीच! पण आ. थोरात आले आणि त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला. नसता अख्खा मेळावा नेतृत्व करणार्‍या ना. विखेंच्या नावावर होण्याची भीती! मंचावरील मान्यवरांची नावे घेताना ना. विखे हे आ. तांबे यांचे नाव घेऊन पुढे सरकले.
आ. थोरात मंचावर असल्याचे आठवल्यावर त्यांनी ‘सॉरी’ म्हणत त्यांचे नाव उच्चारले! हे बरेच झाले, अन्यथा गटबाजीच्या चर्चेला अनावश्यक मसाला मिळाला असता. मेळाव्यात विखेंआधी थोरात बोलले. गुजरात निवडणुकीचा विषय काढत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकल्याची आठवण त्यांनी करून दिली. संघटनेतील वाढते महत्त्व अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न असावा का? तरिही ना. विखे त्यांचे नाव कसे विसरले? पण या नेत्यांचा वावर आज बर्‍यापैकी एकमेकांना पूरक होता, हे नाकारता येत नाही.
गट-तटाची ही लागण तालुकावार आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतही वेगळी स्थिती नाही. अंतर्गत भांडणे कधी विकोपाला गेली, याचे भान काँग्रेसमध्ये अनेकांना नाही. तेव्हा ही काँग्रेस भाजपला आव्हान कसे देणार, हा प्रश्‍न जनतेला नक्कीच पडू शकतो. याचे काही उत्तर काँग्रेसकडे आहे का?
पक्षात अद्यापही ‘दरबारी’ राजकारण्यांचे वर्चस्व कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लोकनेत्यांची कोंडी होत असते. या मेळाव्याला आलेले खा. गुलाम नबी आझाद हे असेच एक दरबारी राजकारणी! त्यांची कामगिरी आणि मतदारसंघ काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तरी सांगता येईल की नाही, याबाबत शंकाच आहे. खा. आझाद यांना तातडीने दिल्ली जाणारे विमान पकडायचे होते, त्यामुळे सभा त्यांच्या सोयीने संपली! या स्थितीवर काँग्रेस कशी मात करणार? जानेवारीत मला पुन्हा बोलवा, असा सल्ला त्यांनी ना. विखेंना दिला आहे. आज त्यांना ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा बोलवू नका, असा आग्रह कार्यकर्ते ना. विखेंकडे धरतात की काय, अशी शंका आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने काही जमेच्या बाजू आहेत तर काही उणे! काँग्रेसला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खुणावत आहे. विस्कळीत काँग्रेस एकत्र करणे, जनतेच्या मनात आपल्याबद्दल विश्‍वास निर्माण करणे ही मोठी आव्हाने आहेत. त्यावर मात करावी लागेल. जमेल हे काँग्रेसला?

LEAVE A REPLY

*