काँग्रेसच्या नगरसेवकाचा तरुणावर गोळीबार : नगरसेवकाचा पुतण्या गजाआड

0

पक्षांतराचा वाद

अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकीय पूर्ववैमनस्यातून काँग्रेसचे नगरसेवक सुभाष लोंढे यांनी एका तरुणावर गोळीबार करून तलवारीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरातील शिवाजीनगर येथे घडला. राहुल गाढवे असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोंढे यांच्यासह त्यांच्या 12 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नगरसेवक सुभाष लोंढे यांचा पुतण्या दिनेश लोंढे यास अटक केली आहे.

काँग्रेसचे नगरसेवक सुभाष लोंढे, दिनेश संभाजी लोंढे, मनोज सुभाष लोंढे, योगेश सोनवणे, सोनू प्रल्हाद गीते, सुरज संभाजी शिंदे, सुरज संधू पारला, सोनू कासार, महेश चव्हाण व अन्य तिघे अशा 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या गोळीबारात जखमी झालेल्या गाढवे यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर-कल्याण मार्गावर पेट्रोल पंपाच्या परिसरात गाढवे याच्यावर नगरसेवक सुभाष लोंढे यांनी तीन गोळ्या झाडल्या. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहुल गाढवे त्याच्या घरी होता.

या दरम्यान त्याला आरोपींनी शिवाजीनगर येथील मैदानावर बोलावले. सुभाष लोंढे याने गाढवेस दमदाटी करण्यास सुरूवात केली. ‘तू आमच्या तालमीतून बाहेर गेलास व दुसर्‍या पार्टीच्या लोकांना मिळालास. त्यांच्या कॉलेजवर नोकरी करतोस. तू जर पुन्हा आमच्या तालमीत आला नाही, तर तुला ठार मारून टाकू, असा दम त्याला दिला.

त्यावर गाढवे याने लोंढेच्या तालमीत येण्यास नकार दिला असता सुभाष लोंेढे याने हातातील पिस्तुलातून तीन गोळ्या राहुल गाढवेच्या दिशेने झाडल्या. गाढवे याने प्रसंगावधान राखून त्या चुकविल्या व घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अन्य कार्यकर्त्यांनी गाढवे यांच्यावर तलवार व लोखंडी रॉडने वार करण्यात सुरूवात केली. यात गाढवे गंभीर जखमी झाला. हाणामारी सुरू असल्याने आसपासचे नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांची गर्दी पाहून हल्लेखोरांनी पळ काढला.

दरम्यान राहुल गाढवे यास तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा गाढवे यांच्या जबाबावरून दिनेश लोंढे यास अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.

4 ऑगस्टपर्यंत पोेलीस कोठडी –
पोलिसांनी दिनेश लोंढे यास अटक केली असता त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या घटनेत राजकीय पक्षाचे मोठे पदाधिकारी आहेत. एका कार्यकर्त्यावर गोळीबार करून तलवारीने मारहाण करण्यात आली आहे. घटनास्थळी एक पुंगळी मिळून आली आहे. अन्य आरोपींची शोध घेणे आहे. आरोपीचा या घटनेत काय सहभाग आहे. त्याच्याकडून हत्यारे जप्त करणे आहे. अन्य तिघांची ओळख पटवून त्यांना अटक करणे आहे. वादाचे नेमके कारण काय आहे. अशा अनेक गोष्टींची चौकशी करणे आहे. असा सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने लोंढे यास चार ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी वादाची किनार –
हा गोळीबार राजकीय वैमनस्यातून झाल्याचे उघड झाले आहे. राहुल गाढवे हा पूर्वी काँग्रेस पक्षाचे काम करीत होता. लोंढे यांच्या तालमीत तयार राहिलेला राहुल चांगलाच नावारुपाला आला होता. राष्ट्रवादी पक्षाने त्याला फोडून कॉलेजवर कर्मचारी म्हणून नोकरी दिली होती. अचानक पक्षबदल केल्याने राहुलचा राग लोंढे यांच्या मनात खदखदत होता. त्यातून राहुल गाढवे व लोंढे यांच्यात अनेकदा वादावादी झाली.

LEAVE A REPLY

*