20 ऑगस्टनंतर काँग्रेसच्या कारभार्‍यांची निवड

0

पक्षातील संघटनात्मक निवडणुका : सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा संपला

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचा पहिला टप्पा 15 मे रोजी संपला आहे. यात सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. दुसर्‍या टप्प्यात 20 ऑगस्टपर्यंत तालुकाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, प्रदेश प्रतिनिधी या पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या प्रदेश समितीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली.
पक्षातील संघटनात्मक निवडणुका संदर्भात माहिती देताना देशमुख यांनी सांगितले, की 15 मे पर्यंत पक्षाच्या सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आता 30 मे पर्यंत पक्षात संघटनात्मक निवडणुकीसाठी पात्र असणार्‍या उमदेवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
या पात्र उमेदवारांच्या नावावर 6 जूनपर्यंत हरकती घेण्यास मुदत राहणार असून त्याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. 30 जुलैपर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार असून 3 ऑगस्टला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतर 7 ते 20 ऑगस्ट या कालावधीत बूथ स्तरावरील कार्यकारी समिती निवडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यासाठी खा. महेश जोशी, प्रदेश निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच जिल्हा निवडणूक अधिकारी (डी. आर. ओ) व ब्लॉक निवडणूक अधिकारी (बी.आर.ओ) यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
20 ऑगस्टनंतर तालुकाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, प्रदेश प्रतिनिधी यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार डिसेंबर 2017 अखेर देशपातळीपर्यंतच्या निवडणुका पूर्ण करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

निवडणूकपूर्व तयारीसाठी
प्रदेशाध्यक्षांकडून आढावा
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांना सर्व ताकदीनिशी समोरे जाण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीने पूर्व तयारी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी 15 मार्चपासून जिल्हानिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्रदेश देशमुख यांनी दिली. प्रदेशाध्य खा. चव्हाण हे स्वत: या बैठकांचे नियंत्रण करत असून दररोज फक्त तिन जिल्ह्यांचा तपशीलवार आढावा घेत आहेत. या बैठकांमध्ये विधानसभा व लोकसभा मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात येत असून यात प्रामुख्याने मागील निवडणुकांचे निकाल, पक्षाला मिळालेली मते, आगामी निवडणुकीसाठी व्यूहरचना, मतदारसंघातील प्रमुख समस्या, संभाव्य उमेदवार याबाबत चर्चा करण्यात येत आहे. पक्षाच्या पातळीवरून खासगी संस्थेमार्फत मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. आगामी तीन महिन्यांत याचा अहवाल प्राप्त होणार आहे.

LEAVE A REPLY

*