ताकद दाखवण्याच्या नादात काँग्रेस पक्षाची वाताहत

0

निरिक्षकांसमोर कार्यकर्त्यांनी व्यक्ती केली खंत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र, प्रत्येक तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांचे दोन गटाचे स्वतंत्र पदाधिकारी कार्यरत आहेत. हे गट आप आपली ताकद दाखवण्याच्या नादात पक्षाची वाताहात करत आहे. काँग्रेसमधील केडर बेस कार्यकर्त्यांना पक्षांतर्गत निवडणुका फायदा होण्याऐवजी तोटा होत असल्याची खंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आलेल्या बिहार राज्याच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आ. अमिता भूषण यांच्या समोर व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाच्या पक्षातंर्गत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची माहिती घेण्यासाठी निरिक्षक आ. भूषण शनिवारी नगरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी आधी शहरातील पक्षाची स्थिती आणि नोंदणी झालेल्या क्रियाशील सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर स्वतंत्रपणे जिल्ह्यातील पक्षाच्या सदस्यांच्या नोंदणीचा आढावा घेतला.
यावेळी आ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांब, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, बाबासाहेब दिघे, बाळासाहेब हराळ, विनायक देशमुख, वसंत कापरे, उबेद शेख, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र नागवडे, केशवरराव मुर्तडक, दीप चव्हाण यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.
नगरशहराचा आढावा झाल्यानंतर जिल्ह्याचा आढावा सुरू झाला. त्यावेळी उबेद शेख यांनी जिल्ह्यातील गटा-तटाच्या राजकारणावर थेट बोट ठेवले. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात दोन गट कार्यरत आहे. यामुळे पक्षातंर्गत निवडणुका अडचणीच्या झाल्या आहेत. आप-आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात जिल्ह्यात पक्ष कमकुवत होत आहे.
यामुळे निवडणुका घेण्याऐवजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाध्यक्ष जयंतराव ससाणे यांनी या निवडी करण्याचे अधिकार देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.
त्यापूर्वी जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी जिल्ह्यातील क्रियाशील मतदारांची माहिती निरिक्षकांना दिली. अण्णासाहेब म्हस्के यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी असली तरी काही ठिकाणी पक्षात वाद असल्याचे मान्य केले.
मात्र, पक्षातील कार्यकर्त्यांनी धीर धरावा पक्षाचा गत वैभव पुन्हा प्राप्त होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. त्यानंतर आ. तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अखेर निरिक्षक भूषण यांनी पक्षाला जुनी प्रतिष्ठा मिळवून द्याची असले तर पक्ष संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. संघटना मजबूत झाली तर पक्ष मजबूत होईल आणि त्यातून सत्ता आपोआप मिळेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*