बँकिंग क्षेत्रात संभ्रम

0

कर्जमाफी : परिपत्रकाची सर्वांनाच प्रतीक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने शेतकर्‍यांचे सरसकट तत्वत: कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेचा लाभ जिल्ह्यातील किती आणि कोणत्या शेतकर्‍यांचे होणार याबाबत स्पष्टता नसल्याने बँकिंग क्षेत्रातील अधिकार्‍यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. अल्पभूधारक की सरकट शेतकर्‍यांचे कर्ज माफ होणार याबाबत स्पष्टता नसल्याने जिल्हा बँक, अग्रीण बँक आणि सहकार खात्यातील अधिकारी बुचकाळ्यात असून सरकारचा अध्यादेश आल्याशिवाय काहीही भाष्य करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

दरम्यान, पाच एकरापर्यंतच्या शेती असलेल्या शेतकर्‍यांना नवीन कर्ज देण्यात यावे असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले असलेतरी अद्याप बँकांकडे याबाबतची माहिती आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात किती शेतकर्‍यांना किती कर्जमाफ होणार आहे याची स्पष्टता होण्यासाठी आठवडाभर उलटण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने शेतकर्‍यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आणि शेतकर्‍यांपासून भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. प्रत्यक्षात होणारी कर्जमाफी कशी असेल याविषयी अनिश्‍चिता आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भवितव्य राज्य सरकारकडून काढण्यात येणार्‍या अध्यादेशावर अवलंबून राहणार आहे. सरकारने यापूर्वीच जिल्हा बँकेेकडून वेगवेगळ्या प्रकारातील कर्जाची माहिती मागवलेली आहे. यात 50 हजारांचे कर्ज, 51 हजार ते 1 लाख रुपये कर्ज आणि दीड लाखांच्या आतील कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांचा समावेश आहे.
सरकारने वेगवेगळ्या प्रकारात मागवलेली माहिती आणि प्रत्यक्षात कर्जमाफीची घोषणा करतांना ठेवलेल्या अटी, शर्ती यामुळे बँकांना देखील शेतकर्‍यांचे कोणत्या प्रकारातील कर्जमाफ होणार याचा अंदाज आलेला नाही. यासह होणारी कर्ज माफी 31 मार्चपर्यंतच्या कर्जाची, प्रत्यक्षात घोषणा झालेल्या तारखेपर्यंत की 30 जूनअखेर कर्जाला माफी देण्यात येणार याबाबत स्पष्ट नाही. यामुळे बँकिंग क्षेत्रात संभ्रम आहे.
………….
3 हजार 365 कोटींचे
पिक कर्जवाटप
जिल्ह्यात 2016-17 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मिळून 3 हजार 365 कोटी रुपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आलेले आहे. यात खरिप हंगामासाठी 3 लाख 61 हजार 278 शेतकर्‍यांना 2 हजार 601 रुपये तर रब्बी हंगामासाठी 61 हजार 396 शेतकर्‍यांना 763 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. या पिक कर्जात राष्ट्रीयकृत बँकेचा 1 हजार 425 कोटी, व्यापारी बँका 213 कोटी, ग्रामीण बँका 8 कोटी 65 लाख. जिल्हा बॅँक 1 हजार 717 कोटी रुपये वाटा आहे.
………………
राज्य सरकारकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही खरीप आणि रब्बी हंगामातील थकीत कर्जाला लागू राहणार आहे. मात्र, सोमवारअखेर जिल्हा अग्रीण बँकेकडे गेल्या आर्थिक वर्षातील थकीत कर्जाची आकडेवारी उपलब्ध नव्हती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार थकबाकीदार शेतकर्‍यांची आणि त्यांच्या कर्जाची आकडेवारी काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
…………
राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा सहकारी बँकेच्या पिक कर्जाच्या वितरणात फरक आहे. राष्ट्रीयकृत बँका या मंजूर कर्ज कर्जदारास एकदम देतात. तर जिल्हा बँकही लागवडीनुसार टप्प्याने पिककर्ज कर्जदारास अदा करतात. यामुळे वसुलीच्या आकडेवारी जमा करताना अडचणी येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे म्हणणे आहे.
………
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा झालेली असली तरी शासनाकडून अद्याप कोणत्या गाईड लाईन आलेल्या नाहीत. या गाईडलाईन आल्यावर कर्जदार शेतकरी आणि त्यांच्या थकीत कर्जाची आकडेवारी संकलित करण्यात येेईल.
सुनील दायमा, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक.

…………

1594 शेतकर्‍यांना मिळू शकतो लाभ
केवळ अल्पभूधारक शेतकर्‍यांचे कर्जमाफ झाल्यास जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या 1 लाख 594 सभासदांचे 874 कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षात सरकारच्या लेखी आदेशाशिवाय या विषयावर कोणीही अधिकृत भाष्य करण्याचे टाळले आहे.

अटी ठरल्यानंतर कर्जमाफीचं खरं स्वरूप समजणार
निकषासहीत कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिल्याचं सरकारने म्हटलं होतं. कर्जमाफीचे पुढील तत्व, अटी ठरवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे, त्यात मंत्रिगट, सूकाणू समितीचे सदस्य तसेच शासकीय अधिकारी सामील असतील. या अटी ठरल्यानंतर कर्जमाफीचं खरं स्वरूप समजणार आहे.

थकीत रक्कम मिळाल्यानंतरच नवे कर्ज देणे शक्य
राज्य सरकारने कर्ज माफीची घोषणा केल्यानंतर शेतकर्‍यांना सोमवारपासून नव्याने कर्ज मिळणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात असे शक्य नसल्याचे जिल्हा बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. जोपर्यंत कर्जदार शेतकर्‍यांची थकीत रक्कम सरकारकडून बँकांना मिळत नाही तोपर्यंत नव्याने कर्ज मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. सरकार या पैशांची तजवीज कशी करते यावरच सर्वकाही अवलंबून आहे, असे सांगण्यात येते.

 

LEAVE A REPLY

*