गोंधळ घालणार्‍या 13 प्राथमिक शिक्षकांना नोटिसा

0

पोलिसांच्या अहवालानुसार कारवाई : खरे राडेबाज वगळल्याने आश्‍चर्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – गेल्या महिन्यात जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत प्राथमिक शिक्षकांनी दोन तास राडा घातला होता. याप्रकरणी पोलिसांनी 15 शिक्षकांना पोलिसी खाक्या दाखवत कोतवाली पोलीस ठाण्यात पाच तास डांबून ठेवले होते.
त्यानंतर त्यांना शांतता भंग न करण्याची नोटिशीद्वारे समज देऊ सोडून देण्यात आले. पोलिसांच्या कारवाईनुसार जिल्हा परिषद प्रशासानाने गोंधळ घालणार्‍या शिक्षकांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 प्राथमिक शिक्षकांना शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांच्या सहीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत जिल्हा परिषद प्रशासनाने बड्या राडेबाजांना वगळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबरला नगर शहरातील एका खासगी लॉनमध्ये पार पडली. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या सर्वसाधारण सभेत सुरुवातीपासून गोंधळ, हाणामारी सुरू झाली. व्यासपीठावर शिक्षक एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
एकमेकांना शिव्या घातल्या. सुमारे दोन ते अडीच तास सुरू असलेल्या गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर शिक्षक नेते पोलिसांवरही धावून गेले होते. यामुळे नाइलाजास्तव कोतवाली पोलिसांना शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करावी लागली. यात 15 शिक्षक आणि 3 शिक्षिका (बँकेच्या संचालिका) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात नेले होते. यात शिक्षिकांचा काही संबंध नव्हता. त्या संचालक असल्याने त्यांची नावे पोलिसांनी वगळली होती.
मात्र, उर्वरीत 15 शिक्षकांमधील दोन शिक्षकांची नावे कोतवाली पोलिसांनी वगळून उर्वरीत 13 शिक्षकांची नावे जिल्हा परिषदेला कळवली. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने 13 शिक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये महाराष्ट्र पोलीस कलम 112-117 प्रमाणे पोलीस कारवाई करून शांतताभंग न करण्याची समज संबंधित शिक्षकांना पोलिसांनी दिलेली आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला असून यामुळे या 13 शिक्षकांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याचे सिध्द होत आहे. शिक्षकांच्या गोंधळाच्या बातम्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली असून शिक्षक या पदावर कार्यरत असताना सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे आयोग्य आहे.
जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियम 3 व 5 चा भंग केल्याचे दिसून येत आहे. या गैरवर्तणूक आणि जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये, याचा सात दिवसांत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा न दिल्यास आरोप मान्य असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यांना आहेत नोटिसा –
राजेंद्र महादेव जायभाय (पाथर्डी, मुले शाळा). संजय अप्पासाहेब धामणे (देऊळगाव सिध्दी, नगर). बाळासाहेब सुभाष कदम (मेहकरी, नगर). बाजीराव कोंडीराम मोढवे (दत्तनगर, श्रीरामपुर).
विजय सुभाष जाधव (श्रमजी वसाहत, जामखेड). राजेंद्र संपत ठोकळ (कुकाणा,नेवासा).
भाऊसाहेब कारभारी राहिंज (पिंपरणे, संगमनेर). रावसाहेब दशरथ हराळ (भाणगाव, श्रीगोंदा). रामदास मच्छिंद्र गव्हाणे (डाऊच, कोपरगाव). भास्कर पोपटराव कराळे (उक्कडगाव, नगर).
देवेंद्र गोपाळराव आंबेटकर (सोमठाणे, पाथर्डी). योगेश अण्णासाहेब थोरात (हरिबावाकडी, संगमनेर). शिवाजी आव्हाड (घुलेवाडी, संगमनेर). 

सर्वसाधारण सभेनंतर काही काळ आक्रमक झालेला जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकारी आता शांत झाल्याचे दिसत आहेत. शिक्षक बँकेकडून प्रशासनाने सभेच्या चित्रिकरणाच्या सीडी, वृत्तापत्रातील कात्रणे आणि फोटो तपासले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांच्या अहवालानंतर अवघ्या 13 शिक्षकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. हा प्रकार अन्यायकारक असल्याची संतप्त प्रतिक्रिया नोटिशीमध्ये नाव असणार्‍या एका शिक्षकांने व्यक्त केली आहे. कारवाई करावयाची असल्यास गोंधळ घालणार्‍या सर्व शिक्षकांवर करावी. तोंड पाहून कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

LEAVE A REPLY

*