एसटीच्या खडखडाटाला बसणार आळा; आरटीओकडून एसटीच्या 1100 बसेसच्या माहितीचे संगणकीकरण

0
नाशिक (प्रवीण खरे) | तुम्हाला गळक्या बसेसमधून प्रवास करवा लागतोय… चालू एसटीत गाडीच्या टायरचे मोल्डिंग निघून बस बंद पडलीये… गिअरबॉक्स अडकून एसटी घाटात बंद पडून तुम्हाला मनस्ताप झालाय.. या व अशा घटना प्रत्येक प्रवाशाबरोबर कधी ना कधी घडल्या आहेत.

आजारी बसेस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार यापुढे काहीअंशी बंद होणार आहेत. आरटीओकडून नाशिक विभागातील 1100 बसेसच्या माहितीचे संगणकीकरण होत असून त्यामुळे जुन्या बसेस चालवण्याला आपोआपच आळा बसणार आहे.

एसटीला प्रत्येक बसचे फिटनेस सर्टिफिकेट आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन विभागाकडून घ्यावे लागते. त्यासाठी दररोज दोन ते चार बसेसची तपासणी एसटी आरटीओ विभागाकडून करवून घेते. यात आवश्यक असणारे बदल किंवा बसेसची स्थिती, करावयाचे बदल, इंजिनबाबतच्या समस्या, दुरुस्तीसह इतर आवश्यक त्या सूचना आरटीओ आपल्या अहवालात देत असते.

फिटनेस सर्टिफिकेट काढण्याची प्रक्रिया वारंवार सुरू असते. परंतु तरीदेखील एखादी बस फिट असेल तर तिचा वारंवार वापर करून वर्षभराच्या आत ती खराब होऊ शकते किंवा तिची क्षमता कमी होऊ शकते. असे असतानादेखील एकदा सर्टिफिकेट घेतले की वर्षभर एसटीकडून गांभीर्याने बसेसकडे लक्ष दिले जात नाही.

त्यामुळे नाहक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भररस्त्यात बस बंद पडणे, नवीन बस असूनही ती गळकी असणे, एसटी चालू असताना आवाज येणे, अपघातास करणीभूत ठरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते.

वारंवार घडणारे असे प्रकार रोखण्यासाठी आता आरटीओने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून 19 जुलैपासून एसटीच्या नाशिक विभगातील सर्वच 1100 बसेसच्या माहितीचे संगणकीकरण केले जात आहे. येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे जुन्या बसेस किती? भंगारात काढावयाच्या बसेस किती?

चालवण्यायोग्य व न चालवण्यायोग्य बसेसची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. हे काम प्रगतिपथावर असून त्याद्वारे सुरक्षित प्रवासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

आतापर्यंत नियमित वाहनांप्रमाणे एसटीच्या बसेसची तपासणी केली जात होती. परंतु आता त्याची माहिती वेगळी साठवण्यात येणार असल्याने कोणत्या बसकडे किती लक्ष द्यायचे याबाबत सूचना करण्यासाठी मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*