इन्फ्रा दोनमधील कामे जून अखेरपर्यंत मार्गी लावा; महावितरणचे संचालक साबू यांचे आदेश

0
नाशिक : नाशिक परिमंडळातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पायाभूत विकास सुधारणा आराखडा- दोन (इन्फ्रा दोन) योजनेतून सुरु असलेली कामे येत्या जून अखेरपर्यंत पूर्ण करावेत, असे आदेश महावितरणचे संचालक (प्रकल्प) दिनेशचंद्र साबू यांनी संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांना दिले.

इन्फ्रा-दोन या योजनेतून नाशिक परिमंडळात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी परिमंडळ कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता सुनील पावडे, शैलेंद्र राठोर, दत्तात्रय कोळी, प्रभारी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) हरी ढावरे यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंता, संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

इन्फ्रा- दोन योजनेतून परिमंडळातील वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र उभारणे, उपकेंद्र व रोहित्रांची (डीपी) क्षमतावाढ, अतिरिक्त उच्चदाब रोहित्र, नवीन वितरण रोहित्र बसविणे, नवीन लघुदाब व उच्चदाब वाहिन्या टाकणे आदी कामांचा समावेश या योजनेत आहे. या योजनेतील बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

योजनेतून सुरु असलेली कामे कोणत्याही परिस्थितीत येत्या जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. तर याच योजनेतील पूर्वीच्या ठेकेदाराकडून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी समांतर निविदेतून दिलेल्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. समांतर निविदेतुन दिलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या.

गतिमान विद्युत विकास व सुधारणा कार्यक्रम , पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मक ऊर्जा विकास प्रकल्प योजनांच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. विविध योजनांमधून सुरु असलेली कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी ठेकेदाराना सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

LEAVE A REPLY

*