७०० ‘बीएलओं’वर गुन्हे दाखल करणार; निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका

0
नाशिक । मतदार नोंदणी न करणार्‍या जिल्ह्यातील 700 बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा निर्णय निवडणूक शाखेने घेतला आहे. जिल्हयात नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओंपैकी 391 बीएलओंनी आयोगाच्या निर्देशानूसार ऑनलाईन कामात स्वारस्य दाखवल्याचेही समोर आले आहे.

नव्या मतदारनोंदणीसाठी जिल्हयात 4928 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदारयादीचे काम पूर्ण करण्याची मुदत दिली होती. परंतु, काहींनी ते काम टाळले, तर काहींनी नोंदणी करण्यासाठीचे साहित्य नेले नसल्याची बाब निदर्शनास आली.

मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नी अवघ्या 9 हजार 200 घरांना भेटी देऊन मतदारांची माहिती संकलित केली आहे. प्रत्यक्षात 7 लाख घरांना भेटी देणे आवश्यक असतांना अवघ्या 10 हजार घरांना भेटी दिल्याने यामुळे निवडणूक कामात कसुर केल्याप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी संबधित तालुक्याच्या तहसिलदारांना निवडणूक शाखेने नोटीसा बजावल्या.

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरं म्हणजे सुरूवातीपासूनच बीएलओंनी निवडणूक कामाला विरोध दर्शवला होता. बीएलओंना घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांची अचूक माहिती घ्यावयाची आहे.

त्यात दुबार नावे, मयत, स्थलांतरित यांच्यासह 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण होणार्‍या मतदारांची नोंदणी करावयाची आहे. तसेच स्मार्ट फोनचा वापर करून मतदारांच्या घराचे अक्षांश, रेखांशही संग्रहित करण्यास सांगितले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 7 लाख घरांना प्रत्यक्ष भेट द्यायची असून 42 लाख मतदारांची यात पडताळणी करायची आहे.

त्यासाठी 15 तालुक्यांत 4 हजार बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. पण 15 दिवसांत फक्त 9 हजार 200 घरांनाच भेट देण्यात आली असून त्यांचा ऑनलाइन डेटा मिळाला आहे. त्यामूळे निवडणूक कामात कसूल केल्याप्रकरणी आता या बीएलओंवर थेट गुन्हा दाखल करण्याचाच निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी राज्यात जळगाव जिल्हयात 69 बीएलओंवर याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*