घोटी खुर्दच्या पोलीस पाटलासह सोसायटी चेअरमनवर विनयभंग व दंगलीचा गुन्हा

0
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील पोलीस पाटील आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनवर विवाहितेचा विनयभंग आणि दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यासह अन्य पाच जणांवर वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

सहाही जणांवर विनयभंग, तीक्ष्ण हत्यार बाळगले आणि दंगल घडवणे आदी कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पाटलानेच गुन्ह्यात सहभाग घेतल्याने पद रद्ध होणार का? याविषयी इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील २८ वर्षीय विवाहित महिला आपल्या कुटुंबासह शेतीत काम करीत होती. यावेळी घोटी खुर्द गावचा पोलीस पाटील कैलास बहिरु फोकणे, विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन बाळासाहेब मुरलीधर खातळे, साहेबराव मुरलीधर खातळे, ललीतकुमार बाळासाहेब खातळे, उत्तम बाळासाहेब खातळे, गोरक्ष बाळासाहेब खातळे यांनी विवाहितेच्या शेतात जेसीबी मशीन घालून रस्ता तयार करायला सुरुवात केली. यावेळी विवाहितेसह कुटुंबीयांनी विरोध केल्याने त्यांना आरोपींनी जबरी मारहाण केली.

यासह २८ वर्षीय विवाहित महिलेला धरून ठेवत तिचा विनयभंग केला. तीक्ष्ण हत्यार दाखवून जीवे संपवून टाकण्याची धमकी दिली. या सर्वांनी तुम्ही आमच्या नादी लागायचे नाही. तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी देत घरावर दगडफेक केली अशी फिर्याद विवाहितेने वाडीवऱ्हे पोलिसांकडे दाखल केली आहे.

पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक टी. एन. आठवले यांनी विनयभंग, दंगल घडवणे, तीक्ष्ण हत्यार बाळगणे आदींचे कलम  ३५४, ३५४ अ, ३३६, ४२७, ४४७, ३२३, १४३, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान खुद्द पोलीस पाटलासह, सोसायटीच्या चेअरमनवर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासह संबंधितांची पोलीस पाटीलकी रद्द होणार का याविषयावर तालुक्यात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

*