Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यासरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी

सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पीकांची मोठी हानी झाली आहे.

- Advertisement -

सोयाबीन, मकासह द्राक्षांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांदा रोपे सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत शासनाकडून ठराविक ठिकाणीच पंचनामे सुरू आहेत. शासनाने नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला.हा प्रस्ताव तत्काळ शासनाला पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिले.

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची मासिक ऑनलाईन बैठक अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरूवातीला डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी हा विषय उपस्थित करत, सभेचे विषयाकडे लक्ष वेधले.ते म्हणाले, यंदा जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. यातच गेल्या आठवडयापासून जिल्हयात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसला आहे. कांद्याची रोपे शंभर टक्के वाया गेली आहेत.सोयाबीन पिकात पाणी साचल्याने सडले आहे. मकाही वाया जाण्याची शक्यता आहे. यातच शासनाकडून नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या भावना सदस्यांनी व्यक्त केल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रत्येक तालुका कृषी अधिकार्‍यांना दिले असल्याचे कृषी सभापती संजय बनकर यांनी सांगितले.

परंतू , असे असतानाही ठराविक ठिकाणीच पंचनामे केले जात असल्याचे डॉ. कुंभार्डे यांनी निर्देशनास आणून दिले. यासाठी नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यात यावी,असा ठराव सभेत झाला. या चर्चेत भास्कर गावित, सविता पवार यांनी सहभाग घेतला. अतिवृष्टीचा फटका पिकांना बसलेला असतानाच ग्रामीण भागातील रस्त्यांनाही बसला आहे. रस्ते उखडले आहेत. रस्ते नादुरूस्त झाले आहेत. पुराने अनेक छोटे वळण बंधारे वाहून गेले आहेत.

यासाठी नुकसानग्रस्त रस्ते, बंधारे यांची पाहणी करून अहवाल सादर करावा , त्यास शासनाकडून निधीची मागणी करावी,असा ठराव बैठकीत झाला.

या बैठकीस उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, सभापती बनकर, सुरेखा दराडे, सुशिला मेंगाळ, आश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.

दरमहा एक हजार मानधन द्यावे

करोना संकटात आशा, सेविका, सेवक जीवाची बाजी लावून काम करत असताना त्यांना अगदी कमी मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्याची मागणी सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. करोनाकाळात काम करणार्‍या आशांना दरमहा एक हजार मानधन देण्यात यावे, असा ठराव सभेत झाला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या