16 हजार पटींनी वाढली जय अमित शहांच्या कंपनीची उलाढाल ; काँग्रेसची चौकशीची मागणी

0
नवी दिल्ली – भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी 80.05 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. गेल्यावर्षीच्या टर्नओव्हरपेक्षा तब्बल 16,000 पटींनी वाढ झाली आहे.
कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही ही वाढ कशाच्या आधारे झाली आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत केली.
कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने यंदाच्या वर्षी 80.05 कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने स्वत:हूनच ही माहिती कंपनी नोंदणी कार्यालयाला दिली आहे.
मात्र, कंपनीच्या गेल्यावर्षीच्या उलाढालीवर नजर टाकल्यास यामध्ये तब्बल 16,000 पटींना वाढ झाली आहे. परंतु, या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही त्यांनी इतका उत्कर्ष कसा साधला, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला.
हे आश्चर्यकारक नाही का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताबदल झाल्यानंतर हे सर्व घडले आहे. यालाच भांडवलदारांची कंपूशाही म्हणतात. आता पंतप्रधान सीबीआयला या सगळ्याची चौकशी करायला सांगणार आहेत का? जय शहा यांना अटक होईल का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार का?, असेही सिब्बल यांनी विचारले.
दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जय शहा हे नोटबंदीच्या निर्णयाचे सर्वात मोठे लाभार्थी आहेत, असा आरोप केला आहे. अखेर नोटबंदीमुळे फायदा झालेले लोक आपल्यासमोर आले आहेत. मात्र, यामध्ये रिझर्व्ह बँक, गरीब जनता किंवा शेतकरी यापैकी एकाचाही समावेश नाही. अमित शहा हेच नोटबंदीचे शहा-इन-शहा आहेत, असा शाब्दिक हल्ला राहुल गांधी यांनी ट्विटरवरून केला आहे.
टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. जय शहा तसेच जितेंद्र शहासुद्धा कंपनीचे संचालक आहेत. अमित यांच्या पत्नी सोनल शहा कंपनीच्या भागीदार आहेत.

 

LEAVE A REPLY

*