पतसंस्थांसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती करावी : ना. राधाकृष्ण विखे पाटील

0

  शिर्डी येथे सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिराचे उद्घाटन

शिर्डी (प्रतिनिधी) – राज्य सरकारमधील मंत्री व आमदारांचा सहकाराशी संबंध नसल्याने ते सहकारी संस्थांवर टिकेची झोड उठवून या चळवळीलाच बदनाम करीत आहेत. या चळवळीतील दोषींना जरूर शिक्षा करा.
मात्र चळवळीला संपवू नका, असा मौलीक सल्ला देतानाच पत नसलेल्या लोकांसाठी पतसंस्था चळवळीने दिलेले योगदान लक्षात घेऊन पतसंस्थांसाठी सहकार आयुक्तालयाच्या धर्तीवर स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती राज्य सरकारने करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शिर्डी येथे राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन को. ऑप.क्रेडीट सोसायटीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्षा योगीता शेळके, ओमप्रकाश कोयटे, प्रकाश पोहरे, सुकेश झंवर यांच्यासह राज्यभरातील सहकारी पतसंस्था चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांरभी उत्कृष्ठ पतसंस्थाचा कारभार करणार्‍या प्रत्येक विभागातील पतसंस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ना. विखे पाटील म्हणाले, सामान्य जनतेच्या ताकदीवर राज्यात सहकार चळवळ मजबूत झाली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये सहकारी चळवळीतून तयार झालेले नेते होते. विद्यमान सरकारमधील मंत्री व आमदारांचा सहकारी संस्थाचा संबंध नसल्याने ते सहकारावर तुटून पडले आहे.
त्यातून ही चळवळ बदनाम होत आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीसाठीच पतसंस्था अस्तित्वात येता कामा नये.राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती सरकारने करावी.
या आयुक्तालयाने पतसंस्थांच्या उत्थानासाठीच काम करावे. अलीकडच्या काळात आयुक्तालयांची कामे फक्त सहकारी संस्थाच्या चौकशीपुरतीचे राहिले आहे.परंतु या आयुक्तालयामार्फत पतसंस्था व सहकारी संस्थांच्या पुनर्जिवनाचेही काम होणे गरजेचे आहे.
यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकारी संस्थाच्या जपवणुुकीसाठी मंत्री म्हणून आपण दुजाभावाची वागणूक देणार नाही. या चळवळीतील अडचणींच्या सोडवणुकीसाठी विखे पाटील व आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आसल्याचे सांगितले.
पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील पतसंस्थांचा तारक नेता म्हणून ते काम करित आहेत. विठ्ठलराव विखे पाटील यांनी घातलेल्या सहकाराचा वारसा सक्षमपणे जपण्याचे काम विखे पाटील करित आहेत.
सध्या सरकार पतसंस्थाकडून झिजिया कराची वसुलीचे काम सरकार करीत असल्याने त्यातून राज्यातील पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. विखे पाटील व गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नातून पतसंस्थांची सोडवणूक करावी, अशी मागणी केली.

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी असल्याने ते नवनवीन कायदे आणत आहे. त्यातून सहकारी चळवळच नामशेष होणार आहे. कृषिउत्पन्न बाजार समित्याच्या निवडणुकीत आता शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देऊन सरकार काय साध्य करणार आहे? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.राज्यातील शेतकर्‍यांना नवीन कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या राज्यात 24 सहकारी बँका अडचणीत असल्याने तेथील शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करून देताना अडचणी निर्माण झाल्या आहे.शेतकर्‍यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी मालतारण कर्ज योजनेला सरकारने मान्यता द्यावी व गावोगाव कृषी मालाचे गोडावून निर्मितीचे काम करावे लागणार आहे. त्याचा लाभ शेतकर्‍यांना होणार आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*