Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

महागाईपासून दिलासा; भाज्यांचे भाव घसरले! आवकही वाढली; नाशिककरांना दिलासा

Share

नाशिक । प्रतिनिधी

परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भाज्यांचे भाव कडाडले होते. परंतु डिसेंबरमध्ये चांगल्या दर्जाच्या भाज्या बाजारात येऊ लागल्या असून हळूहळू आवकही वाढू लागली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव किलोमागे 10 ते 20 रुपयांनी कमी झाल्याने नशिककरांना दिलासा मिळाला आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भाज्यांच्या भावांनी शंभरी गाठली होती. त्यामुळे गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडले होते. त्यात गेल्या दोन आठवड्यात कांद्याने शंभरी पार केल्यामुळे घरखर्चात आणखी भर पडली. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांचे भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे भाव 30 रुपयांवरून 15 ते 20 रुपये, भेंडीचे भाव 60 ते 70 रुपयांवरून 45 ते 50 रुपये तर फ्लॉवरचा भाव 50 रुपयांवरून 30 ते 35 रुपये झाला आहे. परंतु पालेभाज्यांचे भाव चढेच आहेत. एक जुडी मेथीसाठी 25 ते 30 रुपये, पालकसाठी 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.

कांद्याचे भावदेखील उतरत असून भाजी मंडईत लाल कांदा 70 ते 80 रुपये किलो, जुना कांदा 110 ते 120 रुपये किलो दराने विकला जात आहे. लसूण 250 ते 300 रुपये किलो, गाजर 50 ते 60 रुपये, बीट 35 ते 45 रुपये व कारले, दोडके, गिलके अनुक्रमे 40 ते 70 रुपये किलो या दराने मिळत आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी 257 क्विंटल लाल (पोळ) कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी 2 हजार तर जास्तीत जास्त 7700 रुपये भाव मिळाला. तसेच सरासरीला 4500 रुपयांचा भाव मिळाला.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!