Type to search

Featured नाशिक

Photo Gallery: चिंचलेखैरे येथे रंगला रान भाजी महोत्सव

Share

चिंचलेखैर | प्रशांत निकाळे

इगतपुरीतील अतिशय दुर्लक्षित व दुर्गम आदिवशी पाडा. नाशिक व ठाणे जिल्ह्याच्या अगदी वेशीवरील गाव. गावात जाण्यासाठी अगदी तीन फुटाची खडकाळ वाट आहे. खैरे पाड्याला जायचेच म्हटले तर चार ओहाळ पार करून साडेतीन किलोमीटर पायी, नाशकातील सर्वात घनदाट जंगलातून जावे लागते. कुणी आजारी पडला तर डोंगी बनवूनच आणावे लागते. गावात फक्त आठवी पर्यंत शिक्षण घेण्याची सोय. त्यानंतर शिक्षण घ्यायचे म्हटले तर रोज पायी १३ किलोमीटर इगतपुरी शहरात यावे लागते. अशा बिकट परिस्थितही शाळेतील शिक्षकांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला, ‘रान भाजी महोत्सव’.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचलेखैरे येथे पोषण आहार माह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य तपासणी. वैयक्तिक स्वच्छता, ग्रामस्वच्छता प्रभात फेरी तसेच स्वच्छतेचे संदेश हात धुण्याच्या पद्धती असे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. आरोग्याचे पोषण याचाच एक भाग म्हणून आदिवासी दुर्गम भागातील रानभाज्या व त्यांचे सेंद्रिय पद्धतीने मानवी शरीरासाठी होणारे फायदे जाणून घेणे व त्याचा प्रत्यक्ष आस्वाद घेणे यासाठी चिंचलेखैरे येथे शाळेमध्ये रानभाजी महोत्सव विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला.

यामध्ये पाच विद्यार्थ्यांचे स्टॉल करून मांडणी केली. यात 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी इगतपुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून खास करून या उत्सवाला तीस ते पस्तीस ज्येष्ठ नागरिकांनी भेट दिली. आणि प्रत्यक्ष रान भाज्यांचा आस्वाद घेतला. आगळावेगळा अनुभव व निसर्गात जाऊन लहान मुलांमधील लहान होण्याचा आनंद या विद्यार्थ्यांना बरोबर ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय केंद्रप्रमुख राजाराम जाधव होते. गावातील शंभर ते दीडशे च्या आसपास ग्रामस्थ व माता उपस्थित होते. यावेळी आदिवासी नृत्य सादर केले. नितीन निवृत्ती तळपाडे फुडटेक यांनी ज्येष्ठ नागरिकांनी उतारवयात कोणता आहार घ्यावा कोणते व्यायाम करावे याबाबत मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक. हौशीराम भगत ,भाग्यश्री जोशी, योगेश गवारी, नामदेव धादवड ,प्रशांत बांबळे ,यांनी अतोनात परिश्रम घेतले .तसेच शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे मामा यांनी सर्व मान्यवरांचे रानफुले देऊन स्वागत व सत्कार केला. ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष माननीय परदेशी व पूरणचंद लुणावत यांनी आशिर्वाद दिले.

विद्यार्थ्यांनी ‘रान भाजी महोत्सव’ यासाठी विविध रान भाज्या व भाकरी तयार केल्या होत्या. यात प्रामुख्याने चिचूरटी, मोहाच्या फुलाची भाजी, मोहाच्या फळाची भाजी, रान कारले, रानकेळी, रान दोडके यांसारख्या भाज्या. त्याचप्रमाणे ज्वारी, बाजरी, नागली व तांदळाच्या भाकरी विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!