Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशलष्कराच्या दोन अधिकार्‍यांसह पाच जवान शहीद

लष्कराच्या दोन अधिकार्‍यांसह पाच जवान शहीद

सार्वमत

पाच वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं ‘कर्नल’ गमावला
श्रीनगर – जम्मू-काश्मीरातील हंदवाडा येथे शनिवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताच्या दोन लष्करी अधिकार्‍यांसह तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं. कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.

- Advertisement -

शहीदांमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांचा आणि एका मेजर चा समावेश आहे. कुपडावा जिल्ह्यातील हंदवाडा शहरातील चांगिमुला येथे काही स्थानिक नागरिकांना दहशतवादी बंदी बनवणार आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानुसार, या ठिकाणी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त मोहिम राबवण्यात आली.

दरम्यान लष्कर ए तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात लष्कराच्या दोन अधिकार्‍यांसह पाच जवानांना हौतात्म्य आले. त्यामध्ये भारतीय सैन्याने कर्नल दर्जाच्या अधिकार्‍याला गमावले. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या दर्जाच्या अधिकार्‍याला वीरमरण प्राप्त झाले आहे. कर्नल आशुतोष शर्मा, असे या जिगरबाज अधिकार्‍याचे नाव आहे.

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. वर्चस्वाच्या या लढाईतूनच टीआरएफने शनिवारी रात्री उशिरा हा हल्ला केला. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारीही घेतली आहे. दहशतवादी आणि भारतीय सैन्याच्या या लढाईत सैन्यातील 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. चांजमुल्ला भागात शनिवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, लष्कराचे दोन जवान आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला हौतात्म्य आले. यातील कर्नल आशुतोष शर्मा यांनी यापूर्वी दहशतवाद्यांविरोधातील अनेक कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र, या कारवाईत त्यांना हौतात्म्य आले.

21 राष्ट्रीय रायफल युनिटचे नेतृत्व सांभाळणार्‍या कर्नल आशुतोष यांना दोनवेळा वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. काऊंटर टेरिजस्म ऑपरेशनमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. गार्ड्स रेजिमेंटमधून येणारे कर्नल शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोर्‍यात कर्तव्यावर होते. शर्मा यांना त्यांच्या शौर्याबद्दल सेना मेडलनेही गौरिवण्यात आले होते. कर्नल शर्मा जेव्हा कमांड ऑफिसर होते, त्यावेळी एकदा ते आपल्या सहकार्‍यांसमवेत रस्त्यावर असताना एक दहशतवादी कपडयांमध्ये ग्रेनेड लपवून त्यांच्या दिशेने येत होता. शर्मा यांनी लगेच त्याची चाल ओळखली व क्षणाचाही विलंब न लावता आपली बंदूक काढली व त्या दहशतवाद्याला तिथेच कंठस्नान घातले. आशुतोष शर्मा यांच्या सतर्कतेमुळे युनिटमधील जवानांचे आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे प्राण वाचले. यासाठी त्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कर्नल शर्मा यांना आलेलं वीरमरण हे भारतीय सैन्याची मोठी हानी आहे. काश्मीर खोर्‍यात एवढ्या उच्च दर्जाच्या अधिकार्‍यास 5 वर्षापूर्वी वीरमरण आले होते. जानेवारी 2015 मध्ये एका ऑपरेशनमध्ये कर्नल एमएन रॉय शहीद झाले होते. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात कर्नल संतोष महाडिक यांनाही वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर, 5 वर्षांनी भारतीय सैन्याने एवढ्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यास गमावले आहे. त्यामुळेच, कर्नल शर्मा यांचे वीरमरण सैन्याची, देशाची मोठी हानी आहे.
दरम्यान, उत्तर-काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडाच्या चांजमुल्ला भागात शनिवारी एका घरात लपलेल्या काही दहशतवाद्यांनी नागरिकांना बंधक बनवले होते. मिळेलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या एका तुकडीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागाला घेरले आणि सर्व नागरिकांना सोडवले. जेव्हा बंधक नागरिकांना सोडवण्यात येत होते. तेव्हाच दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार केला. यानंतर लष्करानेही प्रत्युत्तर दिले. यात लष्कराचे अधिकारी कर्नल आशुतोष शर्मा आणि मेजर अनूज यांच्यासह दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीसचे उपनिरीक्षक शकील काझी यांना हौतात्म्य आले.

बलिदान विसरणार नाही – पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांविरुद्ध लढताना शहीद झालेले अधिकारी आणि जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. हंदवाडा चकमकीत शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली, त्यांचा पराक्रम आणि बलिदान कधीही विसरणार नाही. त्यांनी पूर्णपणे निष्ठेने देशाची सेवा केली. आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अविश्रांत मेहनत घेतली असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या