महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

0
वडाळा महादेव (वार्ताहर)- सुट्टीसाठी आपल्या आजोबाकडे आलेल्या एका तरुणाचा मृतदेह श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरातील एका विहिरीत आढळला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील वडाळा महादेव येथे सुट्टीसाठी आपल्या आजोबाकडे आलेला तरुण आकाश संजय राऊत (वय-21) हा शेतात आजोबाकडून येतो व तेथून त्यांच्याकडून गाडी घेऊन परीक्षेसाठी जातो असे म्हणत घरातून बाहेर पडला काही वेळाने त्याचे आजोबा घरी आल्यानंतर आजोबांनी आकाशची चौकशी केली.
त्यामुळे आकाश घरीही नाही, शेतातही नाही परीक्षेसाठीही गेला नाही असे त्यांना आढळल्याने त्याच्या आजोबांनी व काही ग्रामस्थांनी आकाशचा शोध घेण्यात सुरुवात केली. शेवटी गावातील त्यांच्या शेताच्या रोडवर गट नं. 224 मध्ये शंकर पवार यांच्या विहिरीच्या कडेला आकाश याचे शालेय साहित्य आढळून आले.
त्यामुळे ग्रामस्थांना संशय आल्याने तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली. तत्काळ श्रीरामपूर शहर पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मारूती कोळपे, प्रदीप बढे, किशोर जाधव यांनी घटनास्थळी दाखल होऊन पहाणी केली असता आकाशचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
पोलिसांनी काही ग्रामस्थाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदन करण्यासाठी श्रीरामपूर येथे पाठविला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. वडाळा महादेव येथे मयत आकाश राऊत याच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.
त्याच्या पश्‍चात आजी, आजोबा, वडील, आई, चुलते, भाऊ, बहिण असा परीवार आहे. आकाश याचे वडील संजय नारायण राऊत सध्या नोकरी निमित्त भेंडा फॅक्टरी येथे वास्तव्यास आहे. आकाश हा विज्ञान शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत होता.
सध्या सुट्टी असल्याने वडाळा येथे आजोबा नारायण राऊत यांच्याकडे आला होता. आकाश हा त्या विहिरीकडे कशासाठी गेला तसेच विहिरीत कसा पडला याबाबत उलटसुलट चर्चा परिसरात सुरू होती.

LEAVE A REPLY

*