शिवकालीन, निजामशाहीतील दुर्मीळ नाण्यांचा संग्रह

0

अब्दुलभाईंनी जोपासला अनोखा छंद

200 देशांच्या नोटा100 देशांची नाणी
अस्तगाव (वार्ताहर) – पिंपळस येथील हाजी अब्दुलभाई हाजी फैज्जूभाई शेख यांना देशी तसेच विदेशी चलनी नोटांचा संग्रह करण्याचा छंद जडला आहे. सहा ते सात लाख रुपये खर्चून त्यांनी किमान 200 देशांतील चलनी नोटा…100 देशांतील नाणे…शिवरायांच्या काळातील शिक्के, नाणे…निजामशाहतील तांब्याचे नाणे… इस्ट इंडिया कंपनीची 100 ची नोट…पोर्तुगीजांच्या जमान्यातील नोटा असा दुर्मीळ नोटा व नाण्यांचा संग्रह त्यांनी केला आहे.
बागवान म्हणून त्यांची ओळख पिंपळस, राहाता तसेच अस्तगाव पंचक्रोशीत आहे. पाच वेळेस ते हज यात्रेला जाऊन आले आहेत. सन 2008, 2010, 2011, 2013, आणि 2014 अशा पाच वेळेस त्यांना ही संधी मिळाली. या यात्रेच्या माध्यमातून त्यांना विविध देशांतील नोटा आपल्या छंदासाठी गोळा करता आल्या.
आपल्याला छंद कसा जडला याबाबत हाजी अब्दुलभाई शेख म्हणाले, माझे कोपरगाव येथील मित्र नामदेव शिरोडे यांच्याकडे गेलो असता त्याच्याकडे पोष्टाच्या तिकीटांचा संग्रह पाहिला. आपण आश्‍चर्यचकित झालो. त्यावर मित्र मला म्हणाला, तू परदेशात जातो, तूही नोटांचा संग्रह कर! मित्राच्या या सल्ल्याने आपण नोटांचा संग्रह करण्याचे ठरविले.
हज यात्रेला परदेशात गेल्यावर जगभरातील मुस्लिम बांधव त्या ठिकाणी येतात. तेथे आपण यात्रेकरुंना सेवा देण्याचे काम केले. त्यावर हे यात्रेकरु आपणाला टीप देत असत. त्या त्या देशातील हज यात्रेकरुंनी त्यांच्या देशाचे चलन टीप म्हणून आपल्याला दिले आणि आपल्या संग्रहात त्याची भर पडली. सन 2008 पासून आपण हा छंद जोपासला. कुठेही दर्ग्यात गेल्यावर तेथील फकिरांकडून त्यांना योग्य मोबादला देऊन जुन्या नोटा, ठोकळे गोळा केले.

  वयोवृध्दांकडूनही जुने ठोकळे, नोटा गोळा केल्या. आंध्रप्रदेशातील निजामाबाद, कर्नाटकातील धारवाड, महाराष्ट्रातील आंबेजोगाई, अशा ठिकाणाहूनही निजामाच्या बंद पडलेल्या नोटा, ठोकळे जमा केले. गुजरातच्या कच्छ, भूज, मध्यप्रदेशातील बडोदा येथून पोर्तुगीजांच्या जमान्यातील, तसेंच  5000, 1000, 10000 रुपयांच्या तीन नोटा नागपूरच्या सेवा निवृत्त मेजर सिन्हा यांच्या कडून दीड लाखाला खरेदी केल्या. शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी पारनेर येथून खरेदी केली. परदेशातही कुणी गेले की तेथील चलन ते घेऊन येतात व आपल्याला देतात. या संग्रहात आपण सहा ते सात लाख रुपये गुंतवून नाण्यांचा नोटांचा संग्रह केला आहे. किमान 200 देशांतील चलनी नोटा, 100 देशातील नाणे, चांदीचे ठोकळे, निजामशाहीतील तांब्याचे नाणे, परदेशातील प्लॅस्टिकच्या नोटा, इस्ट इंडिया कंपनीची 100 ची नोट जमा केली आहे, असे अब्दुलभाईंनी सांगितले.

  कर्नाटक राज्य फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा अश्‍विनी कृष्णमूर्ती यांनी आपल्या घरी येऊन आपल्या संग्रहाला भेट दिली व त्यांनी कौतुक केले. आता पर्यंत दिल्ली, पुणे, अहमदाबाद, नाशिक, कल्याण, या ठिकाणी जुन्या नोटांच्या प्रदर्शनात आपण सहभाग घेतला. ते आपल्या दुर्मीळ नोटांच्या संग्रहाचे पाहाणारांनी कौतुक केले, असेही श्री. शेख म्हणाले.

LEAVE A REPLY

*