जलयुक्त शिवार कामांचे जिओ टॅगिंग तात्काळ करा

0

नगर टाईम्स

जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार्‍यांना सूचना

अहमदनगर (प्रतिनिधी)- जलयुक्त शिवार अभियानातील 2016-17 मधील कामांचे जिओ टॅगिंग करण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. त्याचबरोबर, सन 2017-18 मधील उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करा, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगनाथ भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. ज्या यंत्रणांनी संबंधित कामे केली असतील, त्या यंत्रणांचीच जिओ टॅगिंगची जबाबदारी आहे.

ते झाल्यानंतरच काम केल्यासंदर्भातील देयके अदा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिओ टॅगिंगची कामे गांभीर्याने घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन 2017-18 मधील कामे पूर्ण करण्यासाठी केवळ दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर ही कामे पूर्ण करता येणार नाहीत.

त्यामुळे सर्व यंत्रणांनी याबाबत कामे या वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीनेच कार्यवाही करावी, याशिवाय, 2018-19 मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे तयार करूनही त्याठिकाणी आवश्यक मंजुरी घेऊन कामे सुरू कऱण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी स्पष्ट केले. जिओ टॅगिंगसंदर्भात येणार्‍या तांत्रिक अडचणी तात्काळ दुरुस्त करून घ्या. त्यासाठी पाठपुरावा करा. मात्र, यापुढे अन्य कोणतेही कारण चालणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.

LEAVE A REPLY

*