Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

चिल्लर स्वीकारण्यास बँकांचा नकार; दूध डेअरीचालक अडचणीत

Share

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- दहा व पाच रुपयांची सुट्टी नाणी अर्थात चिल्लर बाजारपेठेतील व्यापारी व बँका स्वीकारीत नसल्याने दूध डेअरी व्यवसाय अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे. चिल्लर स्वीकारली जात नसल्याने लाखो रुपयांची चिल्लर पडून आहे. त्यामुळे दूध व्यावसायिक चिल्लरमुळे हतबल झाले आहेत.

सरकारने दोन हजार रुपयांची नोट बाजारात आणल्यानंतर सुट्या पैशांची चणचण भासू लागल्याने सरकारने मोठ्या प्रमाणात दहा व पाच रुपयांची नाणी बाजारात आणली. परंतु हीच नाणी सध्या दूध व्यावसायिकांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. जे दूध व्यवसायिक पॅकिंगमध्ये दूध विक्री करीत आहेत. ते तर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या व्यावसायिकांना बाहेर विक्री झालेल्या दूध विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सुट्टी नाणी मिळतात. कारण किरकोळ विक्रीमध्ये त्यांना ग्राहक सुट्टे पैसे देतात. ते घेण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नसतो. नाही स्वीकारले तर विक्रीवर परिणाम होतो.पर्यायी ग्राहक देखील तुटतात.

त्यामुळे या विक्रेत्याकडून शंभर, पाचशे व एक हजार रुपयांचे असे दहा व पाच रुपयांची नाणी पॅकिंग करून दिली जातात. परंतु बाहेर बाजारपेठेत व बँकेत ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. वास्तविक पाहाता बँकांनी नाणी स्वीकारणे काही गैर नाही. परंतु याबाबत त्यांचे उत्तर देखील मजेशीर आहे. ते म्हणतात, सुट्टी नाणी मोजायला आमच्याकडे माणसं नाहीत, ठेवायला जागा नाही, तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची ती करा. अशा प्रकारची बोलणी सर्वच बँकांतून ऐकावी लागत असल्याने दूध उत्पादक ही नाणी स्वीकारत नसल्याने सुट्ट्या पैशांचे करायचे काय? असा प्रश्न डेअरी व्यावसायिकांना पडला आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन यातून मार्ग काढावा व सर्व बँकांना सुट्टी नाणी स्वीकारण्याची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी डेअरी व्यावसायिकांनी केली असून आधीच अडचणीत असलेला हा व्यवसाय यामुळे मोठ्या संकटात सापडला असल्याचे डेअरी व्यावसायिकांनी सांगितले.

चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी सांगितले, चैतन्याचे दूध पॅकिंग पिशवीमधून राज्यात व राज्याबाहेर विकले जात आहे. या सर्व ठिकाणाहून आम्हाला मोठ्या प्रमाणात चिल्लर मिळते. ही चिल्लर स्वीकारण्यास बँका नकार देत असल्याने सर्वच डेअरी व्यावसायिकांकडे लाखो रुपयांची चिल्लर पडून आहे. बँका , दूध उत्पादक व व्यापारी सुट्टी नाणी स्वीकारीत नसल्याने मोठी डोकेदुखी वाढली आहे. यामुळे कामगारांचे पगार, व्यापारी देणे व बँक हप्ता भरणे यामध्ये अडचणी येत आहेत. पैसे असून देखील कोणी चिल्लर स्वीकारीत नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या डेअरी व्यावसायिकांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. यातून सरकारने लवकर मार्ग काढण्याची त्यांनी मागणी केली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!