Thursday, April 25, 2024
Homeनगरगोडावूनमध्ये डांबून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुक्त करा

गोडावूनमध्ये डांबून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुक्त करा

शिवसेना नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; उपसंचालकांनी तातडीने माहिती मागितली

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 वर्षांपूर्वी डांबून ठेवलेला आश्वारूढ पुतळा मुक्त करावा, या मागणीचे निवेदन राहात्याचे शिवसेना उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून पालिकेने याप्रकरणी तातडीने माहिती पाठविण्याचे आदेश पालिकेला देण्यात आल्याने अधिकार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

शिवसेना उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे व शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक नेत्यांच्या राजकारणापोटी शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा गेल्या 12 ते 13 वर्षांपासून गोडावूनमध्ये प्रशासनाने डांबून ठेवला आहे.

ही घटना अतिशय लज्जास्पद असून ज्या मुघलांना महाराजांना बंदी बनवता आले नाही, त्या महाराजांचा पुतळा प्रशासनाने कायदेशीरदृष्ट्या बंदी बनवून ठेवला आहे. या प्रश्नी शिवसेना अनेक वर्षांपासून आंदोलन करत असून सर्वसामान्य शिवप्रेमींचीही हीच भावना असून हा पुतळा तातडीने या गोडावूनमधून मुक्त करावा, अशी मागणी आहे.

आपल्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा मुक्त करून या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी व पुतळा मुक्त करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी सर्व माहिती मागविण्याचे आदेश सचिवांना दिल्याचे पठारे यांनी सांगितले.

मंत्रालयातून उपसंचालकांचा फोन येताच पालिका अधिकार्‍यात धावपळ सुरू झाली असून या सर्व प्रकरणाची माहिती तातडीने मागविण्यात आली आहे. या प्रकरणात जे पूर्वी अधिकारी होते त्यांची बदली झालेली असून या पुतळा प्रकरणाची फाईलही गहाळ झालेली आहे. तशी राहाता पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत या फाईलची चौकशीही गुलदस्त्यात राहिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या