Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्र्यांची नगरची सभा तिसर्‍यांदा झाली स्थगित

Share

सोमवारी सभा घेण्याचे माजी खासदार गांधी यांचे प्रयत्न विफल

अहमदनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला नगरचा मुहूर्त काही मिळेनासा झाला आहे. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने रविवारी जिल्ह्यात येणारी यात्रा पुन्हा स्थगित झाली आहे. सोमवारी मात्र पाथर्डी आणि जामखेड येथे सभा होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची रविवारी अकोले, संगमनेर, राहुरी आणि नगर शहरात जाहीर सभा होणार होती. त्याची संपूर्ण तयारी झाली होती. यापूर्वी 17 ऑगस्टला ही सभा होणार होती. मात्र सांगली, कोल्हापूर, सातारा भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने त्यावेळी यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर 24 आणि 25 ऑगस्ट अशी यात्रा निश्चित झाली. त्यातही बदल होऊन ती 25 आणि 26 अशी झाली होती.

अकोले, संगमनेर, राहुरी आणि नगर येथे 25 ऑगस्टला आणि पाथर्डी व जामखेड येथे 26 ऑगस्टला जाहीर सभा होणार होती. त्यातील पाथर्डी, जामखेड येथील सभा होणार असल्या तरी रविवारी होणार्‍या इतर चार सभा स्थगित झाल्या आहेत. जिल्ह्यातील सहा सभांसाठी पक्षीय पातळीवर जोरदार तयारी झाली होती. नगर येथील सभेसाठी तर गांधी मैदानात भला मोठा मंडप उभारण्यात आला होता. पावसाचा अंदाज असल्याने त्याची दक्षता घेऊन हा मंडप उभारण्यात येत होता. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते तयारीचा आढावा घेत होते. मात्र जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा स्थगित झाला. माजी खा. दिलीप गांधी यांच्यावर शहराची जबाबदारी होती. त्यांनी ही सभा रविवारऐवजी सोमवारी घेण्यात यावी, यासाठी मोठे प्रयत्न केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे प्रयत्न होते. मात्र पक्षाकडून त्यांना नकार कळविण्यात आला. सलग तीनवेळा नगर शहरातील सभा स्थगित झाल्याने कार्यकर्त्यांत अस्वस्थता असली तरी जेटली यांच्या निधनामुळे सभा स्थगित झाल्याचे भान असल्याने कोणी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!