Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा एक दिवस पुढे ढकलली1

Share

नगरमध्ये आता 24 ऐवजी 25 ऑगस्टला जाहीर सभा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्ह्यातील दौरा एक दिवसाने पुन्हा पुढे ढकलला आहे. दुसर्‍यांदा दौर्‍यात बदल झाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाजनादेश यात्रा भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. त्याचे नियोजन, मेळाव्यासाठी गर्दी जमविणे आदी बाबींसाठी काही मंत्र्यांवर व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी फडणवीस यांचा जिल्ह्यातील दौरा 17 ऑगस्टला होणार होता.

मात्र त्यापूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात निर्माण झालेली पूरस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी यात्रा स्थगित करून पूरग्रस्त भागातील मदतीकडे विशेष लक्ष दिले होते. भाजपच्या या यात्रेपाठोपाठ राष्ट्रवादीचीही शिवस्वराज्य यात्रा स्थगित झाली होती. सांगली, कोल्हापूर येथील पूरस्थिती निवळल्यानंतर महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात ही यात्रा 24 आणि 25 ऑगस्ट अशी दोन दिवस नगर जिल्ह्यात येणार होती. मात्र पुन्हा एक दिवस ही यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. तसे निरोप भाजपच्या येथील नेत्यांना देण्यात आले आहेत. नवीन कार्यक्रमानुसार नगर शहरात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा आता 24 ऐवजी 25 ऑगस्टला होणार आहे. यात्रा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी खा. दिलीप गांधी यांनी सांगितले. मात्र याचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!