Featured सार्वमत

मोदींच्या नेतृत्वात देशात परिवर्तन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; जनता सरकारच्या पाठीशी

अहमदनगर (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात परिवर्तन होत आहे. विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागले. त्यामुळेच मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देश उत्सुक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांची वाळकी येथे मंगळवारी सायंकाळी सभा झाली. दुपारी तीनला होणारी ही सभा सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, अभिनेत्री दीपाली सय्यद व भाजप-शिवसेना युतीचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात परिवर्तन फक्त मोदीच करू शकतात, असा विश्‍वास असल्याने सर्वसामान्य कुठेही काहीही न बोलता मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ही लाट विरोधकांना दिसणार नाही.

निवडणूक निकालानंतर मोदी नावाची त्सुनामी असल्याचे आणि त्यात इतर पक्ष वाहून गेल्याचे दिसून येईल. केंद्र सरकारने मागील पाच वर्षांत विकास कामे मोठ्या प्रमाणात केली. तीस हजार किलोमिटर ग्रामीण रस्त्यांची कामे सुरू आहेत. भाजपने नदीजोड प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जलशक्ती या नावाने स्वतंत्र जलसंपत्ती मंत्रालय स्थापन करण्यात येणार आहे. फडणवीस म्हणाले, विकासाची कामे केली आणि यापुढेही ती करत राहू. पण ही निवडणूक विकासाबरोबरच देशाच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची आहे. साकळाई योजनेचा प्रश्‍न गेल्या 25 वर्षे जुना आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून 25 वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावत आहोत. ज्यांनी दहा वर्षात साधा साठवण तलाव केला नाही, त्यांनी साकळाईबाबत बोलू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!