मुख्यमंत्र्याच्या मैत्रीचे राजकीय भांडवल करू नये

0
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील : मैत्री विकासकामांसाठीच
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे व्यासपीठ हे माझ्या मतदारसंघाचे व्यासपीठ होते. या व्यासपीठावरून मतदारसंघाचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते सोडविण्यास प्राधान्य दिले. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे. या मैत्रीचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेता म्हणून कालही संघर्ष केला, उद्याही त्याच आक्रमकतेने सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ, असे स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून निर्माण झालेल्या संभ्रमावर भाष्य करताना ना. विखे पाटील म्हणाले, माझ्या मतदारसंघातील सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्‍न निळवंडे कालव्यांचा आहे. समन्यायी पाणीवाटप कायदा, गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण, साई समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणार्‍या विकासकामांसाठी सरकारकडे पाठपुरावा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
या सर्व कामांसाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमात मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असल्याचे ना. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्ष नेतृत्वाने माझ्यावर जी जबाबदारी सोपविली ती मागील तीन वर्षांत यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला.
दुष्काळाचे दौरे, शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर घेतलेली आक्रमक भूमिका राज्याने पाहिली आहे. मी केलेल्या कामकाजाची पक्ष नेतृत्वालासुध्दा जाणीव आहे. असे ना. विखे म्हणाले. राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा ही मागणी आमची कायम असून मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवून त्याचे प्रदर्शन मुंबईत भरविले.
सरकारच्या लोकविरोधी धोरणांवर उद्याही आमचा संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा देतानाच मैत्री असती तर सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढलीच नसती आणि इंदू सरकार या चित्रपटाबाबत हस्तक्षेप करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली नसती.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा आत्मविश्‍वास निर्माण केल्यामुळेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधानी असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि लोकांच्या हिताचे निर्णय होण्यासाठी पक्षाच्या आमदारांचे, सामान्य माणसांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाणे गैर नाही. याबाबत विनाकारण गैरसमज पसरविला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
माझी आणि मुख्यमंत्र्यांची मैत्री ही आजची नाही. गेली अनेक वर्षे विधिमंडळात आम्ही एकत्रित काम करीत आहोत. मी मंत्रिमंडळात असताना अनेक वेळा तेही माझ्याकडे सार्वजनिक हिताची कामे घेऊन येत होते. आज ते सत्तेत आहेत, जनतेची कामे घेऊन मला त्यांच्याकडे जावे लागते. याचा अर्थ आम्ही आमच्या राजकीय भूमिका आणि विचारांपासून दूर गेलो असा होत नाही.
वेगवेगळ्या पक्षांत असलेल्या राजकीय नेत्यांच्या मैत्रीची अनेक उदाहरणे राज्याच्या समोर आहे. त्यामुळे मैत्री असणे हा व्यक्तिगत विषय आहे. त्याचा राजकीय विचारधारा व राजकारणातील निर्णयांशी सबंध जोडणे उचित नसल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
  • पिचड साहेबांचे बोलणे वडीलकीच्या नात्यातून –  सत्तेत असताना मला झालेल्या त्रासाबाबत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सर्व परिस्थिती माहीत होती. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असल्याचे नमूद करतानाच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कोणतेही भाष्य न करता वडीलकीच्या नात्याने ते बोलले आहेत, त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. निळवंडे कालव्यांचा विषय व्यक्तिगत घेण्यापेक्षा पिचड साहेबांनी शिफारस केलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांतील अनेक मुले आमच्या संस्थेत कायमस्वरूपी कार्यरत करून त्यांचे पुनर्वसन केले असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
  • इंदू सरकार चित्रपटाबाबत आमची भूमिका ठाम – 
    इंदू सरकार या चित्रपटावर भाष्य करताना ना. विखे पाटील म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. मात्र अभिव्यक्त होताना देशाच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा असणार्‍या जनमान्य व्यक्तिंमत्वांबाबत समाजाच्या व व्यक्तिंच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, समाजात चुकीचे समज पसरणार नाहीत, याचे भान प्रत्येकाला असले पाहीजे, ही सर्वांची जबाबदारी आहे. हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*