Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

‘ईव्हीएम’ नव्हे, तर जनता आमच्या पाठीशी

Share

मुख्यमंत्री फडणवीस राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – देशात 2004 पासून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान चालू असून, तेव्हा विरोधक जिंकत होते. आता आम्ही जिंकत असल्याने ईव्हीएम त्यांना वाईट वाटत आहे. आमच्या पाठीशी ईव्हीएम मशीन नव्हे जनता आहे. पाच वर्षांत राज्यात केलेल्या विकास कामांमुळे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील जाहीर सभेत व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे सोमवारी जिल्ह्यात आगमन झाले. यानिमित्त जामखेड आणि पाथर्डी येथे त्यांच्या सभा झाल्या. दोन्ही ठिकाणी रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. या दोन्ही सभांना पालकमंत्री राम शिंदे, आ. सुरजितसिंग ठाकूर, आ. मोनिकाताई राजळे, यांच्यासह जामखेड येथील सभेस ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक, कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, मनोज कुलकर्णी, सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, पं. स. सदस्य भगवान मुरूमकर, मनीषा सुरवसे, गौतम उतेकर, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, नगरसेवक अमित चिंतामणी, शामीर सय्यद गणेश आजबे, महेश निमोणकर, भाऊराव राळेभात, राजेश वाव्हळ, गुलशन अंधारे, बिभीषण धनवडे, बाजीराव गोपाळघरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालकमंत्री शिंदे यांनी आपल्या हुशारीने जामखेड-कर्जत मतदारसंघात 70 वर्षातला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी आणला. शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 117 कोटींच्या उजनी पाणी पुरवठ्यासाठी मंजुरी दिली आहे. ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, जामखेडच्या जनतेने महाजनादेश यात्रेला हिरवा झेंडा दाखवून राज्यात भाजपचे सरकार येणार असे विश्वासक संकेत दिले आहेत. पालकमंत्री शिंदे म्हणाले, जामखेड-कर्जत मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजाताई मुंडे यांनी विशेष निधी दिला. मुख्यमंत्री सडक योजनेतून व ग्रामविकास मंत्री मुंडे यांच्या माध्यमातून जामखेड कर्जत मतदारसंघातील सर्व गाव पक्के रस्त्याने जोडले आहेत.

विरोधकांचे आस्तित्त्व नाही : मुख्यमंत्री

पाथर्डी : यात्रा काढणे ही भाजपची परंपरा आहे. सत्ता नसतांना संघर्ष यात्रा तर सत्तेत असताना संवाद यात्रा काढून आम्ही जनतेपर्यंत पोहचतो. गेल्या 15 वर्षात एकही यात्रा न काढणार्‍या विरोधकांची माजोरी आणि मुजोरी एवढी वाढली आहे. राज्यात विरोधकांचे अस्तित्व कोठेही शिल्लक राहिलेले नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सभा आयेजित करण्यात आली होती. माजी आ. वैभव पिचड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खा. दिलीप गांधी, भाऊसाहेब वाकचौरे, प्रदेश भाजप कार्यकारीणी सदस्य अशोक चोरमले, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगावचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सभापती चंद्रकला खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक अरूण मुंडे, अशोक अहुजा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आ. मोनिका राजळे यांनी मतदारसंघात केलेल्या कामांची माहिती असलेल्या विकास पर्व पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांचा हात धरून पुढे आलो असे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष शिकविला.

पाथर्डीत आल्यावर स्व. गोपीनाथ मुंडे व माझे जिवलग मित्र स्व. राजीव राजळे यांची आठवण येते. महाजनादेश यात्रेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. पुढील 25 वर्षे देशात व राज्यात युतीचीच सत्ता राहणार आहे. विरोधकांना विरोधी पक्षात राहण्याचा सराव व्हायला हवा. पुर्वीच्या 15 वर्षातील सत्ताधार्‍यांपेक्षा आम्ही प्रमाणिकपणे जास्त काम केले. गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यावर 50 हजार कोटी अनुदान जमा केले, तर आघाडी सरकारने 15 वर्षात फक्त 20 हजार कोटी शेतकर्‍यांना दिले. हा आमचा अन् त्यांचा कामातील फरक आहे. शेवगाव तालुक्यातील ताजनापुर उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोनच्या 150 कोटी रुपयांच्या खर्चाला आ. राजळे यांच्या मागणीनुसार मंजुरी देण्यात येईल. पाथर्डी -शेवगाव शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून देशात सर्वाधिक कामे राज्यात झाली. उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी मोनिकाताई तुम्ही जागा सुचवा सर्व सुविधा, निधीसह वसतिगृहाला मंजुरी देतो.

यावेळी आ. राजळे म्हणाल्या, अत्यंत यशस्वीपणे कुठल्याही संकटातून मार्ग काढत संघर्षाने राज्य प्रगती पथावर नेणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणीवीस यांच्याकडे पाहिले जाते. पाथर्डी, शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त 50 गावातील पाटपाण्याच्या प्रश्नासाठी सरकारने मदत करावी. पाच वर्षांमध्ये शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणुन मतदार संघातील प्रत्येक गावात पोहचून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!