Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर ‘कही खुशी कही गम’

Share

मुख्यमंत्री फडवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल कोपरगावात जल्लोष

कोपरगाव (प्रतिनिधी) –  देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येथील शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विधिज्ञ रवींद्र बोरावके यांनी पेढे वाटून, फटाके फोडत गुलालाची मुक्तपणे उधळत करत आनंद साजरा केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. दरम्यान या घडामोडीवर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष कैलास खैरे, शिल्पा रोहमारे, श्वेतांबरी राउत, युवा मोर्चाचे वैभव आढाव, पराग संधान, रिपाईचे जितेंद्र रणशुर, विनोद राक्षे, नारायण अग्रवाल, हाशमभाई पटेल, नगरसेवक सत्येन मुंदडा, विद्याताई सोनवणे, दिपा गिरमे, रविंद्र नरोडे, स्वप्नील निखाडे, सुशांत खैरे, अकबरभाई शेख, अरिफ कुरेशी, फकिर महंमद पहिलवान, शरद त्रिभुवन, देवराम पगारे, बाळासाहेब दिक्षीत, दत्ता काले, जॉनसन पाटोळे, वासुदेव शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आज-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, सर्वजातीधर्माला बरोबर घेऊन काम करणांरे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा आहे. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले त्या बद्दलही मनस्वी अभिनंदन. गेल्या पाच वर्षात आपल्याला लोकप्रतिनिधीत्वाची संधी मिळाली. त्या माध्यमातून असंख्य विकासाची कामे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यामुळे जी कामे मंजूर झाली ते देखील आता पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करत स्थिर सरकारला शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहाता आजवर केलेल्या कामातून पुन्हा कार्यरत रहावे. पराभवाने आपण खचून न जाता आणखी काम करू असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले, घडामोडींची माहिती सकाळी बातम्यांमधून मिळाली. दुपारी मुंबईला बैठक असल्याचा निरोप आला आहे. मुंबईत गेल्यानंतरच खरी माहिती समोर येईल. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप वर्पे यांनी सांगितले, अजितदादा तापट स्वभावाचे असून यापूर्वीही त्यांनी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राग शांत झाल्यानंतर ते पुन्हा स्वगृही येतात. राष्ट्रवादीचे नेेते दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन सगळे वाद संपतील. राष्ट्रवादी एकसंध राहील, असे त्यांनी सार्वमतशी बोलाना सांगितले.

आम्ही राष्ट्रवादी सोबतच; अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्वाळा

आ. डॉ. किरण लहामटे हेही पक्षाबरोबरच

अकोले (प्रतिनिधी) – भाजप सोबत जात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली. आ. डॉ. किरण लहामटे हे पक्षाच्या बैठकीसाठी सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्या सोबत काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे तालुक्यातील ज्येष्ठ व युवक नेते, कार्यकर्ते यांची या राजकीय परिस्थिती संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आम्ही राष्ट्रवादी सोबतच, पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम केले व भविष्यातही करत राहणार अजितदादा पुन्हा पक्षाचेच काम करणार अशा एक ना अनेक प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सकाळी राजकीय भूकंप झाल्याचे विविध चॅनेल्सवर दिसले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शपथ घेतल्याची बातमी येताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. अचानक बदललेल्या या राजकीय परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रारंभी संभ्रमावस्था जाणवली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनाही तातडीने मुंबई येथे पक्षाच्या आमदारांच्या बैठकीसाठी बोलविण्यात आले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही राष्ट्रवादी सोबतच आहोत, पवार साहेब हेच आमचे नेते व त्यांच्याच नेतृत्वखाली भविष्यात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळेस शरद पवार यांच्या जाहीर सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारलेले पं. स. चे माजी कृषी अधिकारी भानुदास तिकांडे यांनी आपण व तालुक्यातील कार्यकर्ते हे पवार साहेब यांचे सोबतच राहणार आहोत असे सांगितले. आमदार डॉ. लहामटे हेही पक्षासोबतच राहणार असल्याचे त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार तिकांडे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते सुरेशराव खांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याचे म्हटले. आ. डॉ.लहामटे यांच्यासोबत आपले बोलणे झाले आहे. ते मुंबईला रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे जिल्हा पातळीवरील नेते आपल्याशी बोलल्याचे खांडगे यांनी सार्वमतशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश तिकांडे हे आ. डॉ. लहामटे यांच्यासोबत मुंबईला गेले आहेत. अकोले शहरात युवक कार्यकर्ते एकत्रित येऊन बदललेल्या राजकीय समीकरणा बाबतीत चर्चा करताना दिसून आले.

बारागाव नांदूरला भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

बारागाव नांदूर (वार्ताहर) – बारागाव नांदूर येथे शिवाजी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी कैलास पवार, प्रदीप पवार, समीर पठाण, पप्पू इनामदार, राजेंद्र गोपाळे, सहादू मंडलिक, हमीद इनामदार, अमीत पवार, झुंबर कोहकडे, कासम इनामदार, गुलाबअली सय्यद, चंद्रकांत जाधव, सुकुमार पवार, दीपक पवार, नजीर काकर, आदींसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजप सरकारचे सर्वांनी अभिनंदन केले.

शिर्डीत विखे समर्थक व भाजप कार्यकर्त्यांचा वेगवेगळा जल्लोष

शिर्डी (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा पेच सुटलाय. काल सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या शिर्डीतही भाजप कार्यकर्त्यांनी साईमंदिरासमोर फटाखे फोडून लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला. साईंच्या मध्यान्ह आरती पुर्वी शिर्डीतील भाजप कार्यकर्ते व्दारकामाई जवळ एकत्र जमले, तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देत हा जल्लोष साजरा केला. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या.

भाजप कार्यकर्त्यां बरोबर साईभक्त देखील या जल्लोषात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जयजयकार यावेळी करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यामुळे शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीने फटाके फोडून लाडू वाटून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, मुकुंद मयूर, आकाश त्रिपाठी, चेतन कोते, आबा झाकने, रोहन तोलानी, शिवम् अग्रवाल, माधव जामगे, आकाश वाडेकर, अरुण हजारे, हितेश पारसवानी, प्रवीण थोरे, सचिन शेजवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये मोठी जबाबदारी मिळणार असून शिर्डीमध्ये शिर्डी नगरपंचायत समोर फटाके वाजवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी शिर्डीच्या नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, नगरसेवक सुजित गोंदकर, नगरसेवक सचिन कोते, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, भाजपचे तालुका सरचिटणीस रवींद्र गोंदकर, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन तुषार शेळके, शिर्डी विकास सोसायटीचे संचालक अप्पासाहेब तुकाराम कोते, संचालक साईराम गोंदकर, सुनील गोंदकर, केतन कोते, किरण कोते, प्रसाद बावचे, हरीश थोरात, जयेश बोबडे, हरीश गवांदे, साई तारू, योगेश नागरगोजे, बाळासाहेब पानगव्हाणे, सुभाष बोराडे, टीनू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शपथविधीनंतर बेलापुरात भाजपचा जल्लोष

बेलापूर (वार्ताहर) – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतल्यानंतर काल सकाळी बेलापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. काल सकाळी शपथविधी झाल्याची खात्री झाल्यावर गावातील मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते ध्वजस्तंभ चौकात एकत्र आले. त्यानंतर त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपाचे सर्वश्री विलास मेहेत्रे, भूषण चंगेडे, सूर्यकांत हुडे, वैभव ढवळे, नारायण येवले, निसार बागवान, अभिजित राका, ज्ञानेश्वर कुलथे, गणेश मगर, रमेश नवले आदी उपस्थित होते.

अकोले शहरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा

अकोले (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अकोले शहरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अकोलेचे भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बुके देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर तालुक्यात भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, यशवंत अभाळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी पेढे एकमेकांना भरून आनंद साजरा केला. अकोलेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, परशराम शेळके, सुरेश लोखंडे, सोनाली नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, चेतन नाईकवाडी, भोईर गुरुजी, नवनाथ गायकवाड, हितेश कुंभार यांनी महात्मा फुले चौक व बसस्थानक समोर फटाके फोडत घोषणाबाजी करून जनतेला पेढे वाटून आनंद साजरा केला.

भाजप आमदार संपर्क कार्यालया समोर राहुल देशमुख, विजय पवार, कविराज भांगरे, राहुल बेनके, नाजीम शेख, सुशांत वाकचौरे, संतोष खताळ, विनोद देशमुख, निलेश चौधरी, हुसेन मन्सूर, बाबासाहेब अभाळे, दादाभाऊ मंडलिक, सचिन वैद्य, शशिकांत पवार, मंगेश चव्हाण, दत्तू शेलार, दुर्गेश लोखंडे यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

शिर्डीतील राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठीशीच

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – महाराष्ट्रात काल राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत काल दिवसभर या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या बाजूने की, शरद पवार यांच्या बाजूने असा पेच निर्माण झालेला होता. परंतु शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव नीलेश कोते यांनी सांगितले की, आजच्या ज्या राजकीय घडामोडी होऊन सत्ता स्थापण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो लोकशाहीला घातक आहे. राजकारणात सर्वांनीच सुसंस्कृतपणा टिकवून जनाधाराचा आदर केला पाहिजे. शरद पवार हे राज्यातच नव्हे तर देशातील एक उत्तम नेतृत्व आहे. त्यांनी जो निर्णय घेतला असेल तो निश्चितच राज्याच्या हिताचा असणार आहे. राज्यातील जनता ही शरद पवार यांच्या निर्णयाबरोबरच राहील, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी प्रदेश जिल्हा सरचिटणीस सुधाकर शिंदे म्हणाले, भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय हा योग्य नसून राष्ट्रवादी काँगेेसच्या कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारा आहे. सर्वसामान्य जनतेला न पटणारा असा हा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँगेेसच्या मागे आम्ही खंंबीरपणे उभे राहू असेही ते म्हणाले.

युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सहाही आमदार हे शरद पवार यांच्या सोबतच आहेत. भाजपबरोबर जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा वैयक्तीक निर्णय असल्याचेही पक्षानेच स्पष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

देवळालीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – राज्यात शेवटी भाजपचेच सरकार स्थापनेसाठी देवळाली प्रवरासारख्या पावनभूमीत जन्म घेतलेल्या अजित पवार या भूमिपुत्राने निर्णय घेण्याची क्षमता काय असते? हे जनादेशाचा आदर करीत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष सत्यजित कदम व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नगराध्यक्ष कदम म्हणाले, सामान्य जनतेचे हाल पाहून व शेतकर्‍यांना मदत मिळण्यास होत असलेला उशीर पाहून शेवटी भाजपने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला त्यास अजित पवार यांनी मोठ्या मनाने साथ दिली, याबद्दल मी पवारांचे अभिनंदन करतो.

यावेळी भाजपाचे सुकुमार पवार, राजेंद्र गोपाळे, नगरसेवक सचिन ढूस आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारत शेटे, ज्ञानेश्वर वाणी, सागर खांदे, अजित चव्हाण, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप मुसमाडे, उपाध्यक्ष गंगाधर खांदे, सोसायटीचे सर्व संचालक, नगरसेवक यांच्यासह काशिनाथ खुळे, लक्ष्मण येवले आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे म्हणाले, आता खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना न्याय मिळणार आहे. भाजप सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असून ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ हे शब्द फडणवीस यांनी खरे करून दाखविले आहेत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!