रोटरी पार्किंगला लागला ब्रेक

0
महानगरपालिका आणि शहर पोलीस यांनी संयुक्तरित्या शहरातील वाहतुक कोंडींवर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटीला साजेशा अशी परदेशाच्या धर्तीवर रोटरी पार्किंग उभारण्यासाठी या कामाची निविदा काढली. मात्र सलग तीनदा निविदा काढूनही त्यास प्रतिसाद न मिळाल्याने तूर्त वाहतूक कोंडीवरील उपाय योजनेला ब्रेक लागला आहे. आता या निविदातील अटीशर्थीत बदल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

तात्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न आणि वाहनतळाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी परदेशाच्या धर्तीवर रोटरी पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यासंदर्भातील तातडीने निविदा देखील काढण्यात आल्या होत्या. याकरिता महापालिकेत १२ रोटरी पार्किंग करण्यासंदर्भात या निविदा काढण्यात आल्या.

मात्र तीनदा निविदा काढूनही त्यास कोणत्याही ठेकेदार कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. या निविदेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याने आता प्रशासनाकडून निविदेतील अटीशर्थीचा बदलाचा किंवा या निविदेबाबत फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा नवीन निविदाप्रक्रिया करताना यात कोणत्या अडचणी आहे, काही अटीशर्थीत बदल करता येईल का यासंदर्भात विचार सुरू केला आहे.
महापालिकेने शहरातील १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडून तयार करण्यात आला होता.शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय आवार, पंडित कॉलनीत लायन्स क्लबजवळील जागा, अशोकस्तंभ गुरांच्या दवाखान्याजवळ, शालिमार व सराफ बाजार आदी ठिकाणे निश्‍चित केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राजीव गांधी भवन, इंद्रकुंड, निमाणी चौक, मालेगाव स्टॅण्ड, सोमाणी उद्यान नाशिकरोड याठिकाणी रोटरी पार्किंग व्यवस्था उभारली जाणार आहे. आता ठेकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर तूर्त वाहतूक कोंडी सोडण्याच्या उपाययोजनेस ब्रेक लागला आहे.

LEAVE A REPLY

*