15 ऑगस्टपासून कर्ज व बिल वसुलीवाल्यांना गाव बंद

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सरकार कर्जमाफी करो अथवा ना करो पण येत्या स्वातंत्र्यदिनी होणार्‍या गावोगावच्या ग्रामसभेत संपूर्ण गाव कर्जमुक्त झाल्याचे ठराव करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता गावात कर्जवसुली व सरकारी देणी, वीजबिल वसुलीसाठी येणार्‍यांना गावबंद करण्यात येणार असून तसे फलक लावण्यात येणार आहेत. शेतकरी संपानंतर आता अशा प्रकारचे अभिनव आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती सुरेश ताके यांनी दिली.

 

नुकत्याच झालेल्या सर्वपक्षिय कार्यकर्त्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला. ग्रामसभेत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ठराव करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी जसा कर्जबाजारी झाला आहे. तसेच शेतमजूर, महिला बचतगट, शेतीपुरक व्यावसायीक कर्जबाजारी झाले आहेत. अवेळी पाऊस, गारपीट, ढगफुटी, दुष्काळ, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

 

 

शेती हा तोट्याचा व्यावसाय बनला आहे. त्यामुळे ग्रामीण समाजव्यवस्था संपण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगट व ग्रामीण व्यावसायीकांकडे मोठ्या प्रमाणावर बँकेचे कर्ज थकलेले आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी संपूर्ण व सरसकट कर्जमाफी हा एक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. बँक अथवा वित्त संस्थेच्या प्रतिनिधींना देणी वसूल करण्यासाठी गावात येण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. बळाचा वापर करून जर तसा प्रयत्न झाला तर संपूर्ण गावाने एकजुटीने प्रतिकार करावा, असे आवाहन केले जाणार आहे.

 

 

डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, वेतन आयोगाचे निकष गृहीत धरून या आधारे शेतमालाला भाव द्यावेत आदी ठरावही यावेळी करण्यात आले.

 

 

पुणतांबा येथून सुरू झालेल्या शेतकरी संपाला गटबाजीची व पक्षीय राजकारणाची झळ बसली. त्यामुळे हे अभिनव आंदोलन सुरू करताना पक्ष, गट व नावेही टाळण्यात येणार आहेत. गाव पातळीवरच स्वातंत्र्यदिनापासून आंदोलन सुरू होणार आहे. प्रत्येकाने ग्रामसभेत ठराव करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*