Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान

Share

पुणे । प्रतिनिधी : मान्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात हवामान ढगाळ राहणार आहे. आज (ता.२६) कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. तर गुरूवार ते शनिवार या दरम्यान कोकणात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची सरी पडणार असून अधूनमधून ऊन सावल्याचा खेळ सुरू राहिल अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

पूर्व विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हयातील अनेक भागात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. उर्वरित जिल्हयातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपात पेरणी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. कोकणात भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू असून काही ठिकाणी रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. रत्नागिरी येथे सर्वाधिक ९०.८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

राज्यातील अनेक भागात मॉन्सूनची गेल्या काही दिवसापासून प्रतिक्षा लागून राहिली होती. सोमवारी (ता.२४) व मंगळवारी (ता.२५) दिवसभर या भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातही हवामान अंशत ढगाळ होते. मात्र, मॉन्सूनने राज्याच्या अनेक भागात जवळपास दाखल झाल्यानंतर अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या जिल्हयातील अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला.हा पाऊस भात शेतीसाठी पोषक असल्याने भात रोपे चांगलीच तरारली आहेत.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच खान्देशातही हवामान ढगाळ होते. सोमवारी दुपारनंतर या भागातील अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर धुळे जिल्हयातील जवखेडे येथे सर्वाधिक ७५.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर सांगलीतील मलकापूर येथे ६६ मिलिमीटर पाऊसपडला. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हयातील अनेक भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.

मराठवाड्यातही औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर जालना, बीड, लातूर, उस्नानाबाद, नांदेडजिल्हयातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. लातूरमधील पोहरगाव येथे ६४.८ मिलिमीटरची सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जालनामधील तिर्थपुरी, उस्मानाबादमधील जागजी, परभणीतील माखणी या ठिकाणीही जोरदार पाऊस पडला.

विदर्भातील अमरावती, बुलढाणा, वाशीम जिल्हयातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे या भागात कपाशी लागवडीची तयारी सुरू झाली असून खरीपातील तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. पूर्वपट्यातील जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!